कामतांच्या जामीन आव्हानावर आज सुनावणी
By admin | Published: August 27, 2015 02:14 AM2015-08-27T02:14:52+5:302015-08-27T02:15:08+5:30
पणजी : लुईस बर्जर लाच प्रकरणातील प्रमुख संशयित माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्याच्या पणजी विशेष न्यायालयाच्या
पणजी : लुईस बर्जर लाच प्रकरणातील प्रमुख संशयित माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्याच्या पणजी विशेष न्यायालयाच्या आदेशाला गुन्हे अन्वेषण विभागाने (क्राईम ब्रँच) आव्हान दिले आहे. या आव्हान याचिकेवर गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या येथील खंडपीठात सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती के. एल. वदाने यांच्या एक सदस्यीय खंडपीठासमोर हे प्रकरण दुपारी २.३० वाजता सुनावणीस येणार आहे. नवीन रचनेनुसार आता खंडपीठात फौजदारी गुन्हेगारी प्रकरणे गुरुवारी संध्याकाळी आणि शुक्रवारी पूर्ण दिवस घेतली जातात. यापूर्वी ती दररोज घेतली जात होती.
विशेष न्यायालयाचा निवाडा बेकायदा असल्याचा दावा करून गुन्हे अन्वेषणने या निवाड्याला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. कनिष्ठ न्यायालयाकडून गुन्हे अन्वेषणने सादर केलेले काही महत्त्वपूर्ण कबुलीजबाब ग्राह्य धरले नाहीत, असा दावा आव्हान याचिकेत केला आहे. तसेच आदेशात अनेक दोष असल्याचे म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळालेले लुईस बर्जर लाच प्रकरणात संशयित दिगंबर कामत यांना अटकपूर्व जामीन देताना न्यायालयाने विषयाचे गांभीर्य लक्षात घेतले नाही. कामत हे चौकशीस हजर राहत असल्यामुळे तपासाला सहकार्य करत असल्याचा न्यायालयाचा निष्कर्ष चुकीचा आहे. केस डायरीत अटकेचे कारण नाही, या सबबी खाली कामत यांना जामीन मंजूर केला, तो नियम अटकपूर्व जामिनाच्या बाबतीत लागू होत नाही. तसेच केस डायरीत कोठडीचे कारण नमूद होते, असाही दावा याचिकेत केला आहे.
(प्रतिनिधी)