म्हादईची सुनावणी उद्यापासून
By admin | Published: April 26, 2016 01:39 AM2016-04-26T01:39:40+5:302016-04-26T01:39:40+5:30
डिचोली : बऱ्याच कालावधीनंतर म्हादईप्रश्नी बुधवार दि. २७ रोजी नवी दिल्लीत महत्त्वपूर्ण सुनावणी होत असून गोव्याची टीम
डिचोली : बऱ्याच कालावधीनंतर म्हादईप्रश्नी बुधवार दि. २७ रोजी नवी दिल्लीत महत्त्वपूर्ण सुनावणी होत असून गोव्याची टीम दिल्लीत दाखल झालेली आहे. लवादासमोर उलटतपासणीसाठी प्रतिज्ञापत्र, साक्षीदार यांची जय्यत तयारी केलेली असून गोव्याची टीम सुनावणीसाठी पूर्णपणे सज्ज झाल्याची माहिती अॅडव्होकेट जनरल आत्माराम नाडकर्णी यांनी दिली.
कर्नाटकने मध्यंतरी नाट्यमय घडामोडी करताना पंतप्रधान, संरक्षणमंत्री, मुख्यमंत्री यांना हस्तक्षेप करण्याची गळ घातली व राजकीय पातळीवर हेतू साध्य करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यांचे सर्व मनसुबे सध्या तरी हवेत विरलेले असून त्यामुळे सुनावणीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकाच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
लवादाच्या कक्षेबाहेर प्रश्न सोडवण्यास आमचा विरोध नव्हता. मात्र, ज्या अरेरावी पद्धतीने सर्व प्रकारे खोटारडेपणा करून पाणी वळवण्याचे षड्यंत्र त्यांनी हाती घेतलेले आहे तो दृष्टिकोन पूर्णपणे चुकीचा असल्याचे नाडकर्णी यांनी म्हटले आहे.
हलतरा नाल्याच्या प्रकल्पामुळे ओपा जलशुद्धीकरण प्रकल्प कोरडा पडण्याचा धोका आहे. नद्यांतील व परिसरातील खारफुटीवर परिणाम होणार असून पाणी आटल्याने जलवाहतुकीवर परिणाम होण्याचा धोका आहे. (प्रतिनिधी)