वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांच्याविरुद्धच्या प्रकरणात लोकायुक्तांसमोर उद्या सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2018 01:19 PM2018-08-08T13:19:31+5:302018-08-08T13:20:11+5:30
वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांच्याविरुद्धच्या बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात लोकायुक्त पी. के. मिश्रा यांच्यासमोर उद्या (9 ऑगस्ट) पुढील सुनावणी होणार आहे
पणजी : वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांच्याविरुद्धच्या बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात लोकायुक्त पी. के. मिश्रा यांच्यासमोर उद्या (9 ऑगस्ट) पुढील सुनावणी होणार आहे. गेल्या 26 रोजी लोकायुक्तांनी या प्रकरणात राज्याचे मुख्य सचिव तसेच लाचलुचपत विरोधी विभागाचे अधीक्षक यांना नोटिसा बजावून चौकशी अहवाल सादर करण्यास सांगितले होते. समाज कार्यकर्ते आयरिश रॉड्रिगीस यांनी मंत्री मडकईकर व त्यांची पत्नी जेनीता मडकईकर यांच्याविरुद्ध बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात तक्रार केली होती. जेनीता या जुने गोवे ग्रामपंचायतीच्या सरपंच आहेत. जुने गोवे येथे ऐतिहासिक बॉ जीजस बासिलिका चर्चजवळ मडकईकर यांनी सुमारे २०० कोटी रुपयांचा आलीशान बंगला बांधला आहे, असा दावा करून त्यांच्या एकूण मालमत्तेची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली होती.
10 मे रोजी लोकायुक्तांकडे दाखल केलेल्या तक्रारीनुसार मडकईकर आणि त्यांची पत्नी जेनीता यांच्याविरुद्ध १९८८ च्या भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३ (१) (ड) आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 120 (ब)खाली गुन्हे नोंद करून लाचलुचपत विभागाला या प्रकरणात सखोल चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली होती. आयरिश यांनी आपल्या तक्रारीत मडकईकर यांच्या २०० कोटींच्या या आलीशान बंगल्याचे फोटोही जोडले आहेत. 2015-16 च्या आयकर विवरणपत्रात मंत्री मडकईकर यांनी स्वतःचे वार्षिक उत्पन्न १,४४,३८९ रुपये दाखवले आहे एवढे अल्प उत्पन्न असताना 200 कोटींचा आलिशान बंगला बांधला कसा, असा प्रश्न आयरिश यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी वैयक्तिक कर्ज १० लाख रुपये दाखवले असून राज्याचे महसूल मंत्री रोहन खंवटे यांच्या मालकीच्या शिव समर्थ मोटर कडून हे कर्ज उचलल्याचे तर ५ लाख रुपये कर्ज बंधू धाकू मडकईकर यांच्याकडून घेतल्याचे दाखवले आहे. जेनिता यांच्या नावाने १० लाख रुपये कर्ज दाखवण्यात आले असून हे कर्ज कवठे यांचे बंधू राजेश यांच्या कडून घेतले असल्याचे दाखवले आहे. याशिवाय पतीकडून ६,२४,३६१ रुपये कर्ज घेतल्याचे जेनिता मडकईकर यांनी दाखवले आहे. जुने गोवेतील सर्वे क्रमांक १४३/१ या जागेत ५८० चौरस मीटरमध्ये हा आलीशान बंगला बांधण्यात आला आहे. मंत्री मडकईकर हे सध्या आजारी असून वैद्यकीय उपचार घेत आहेत.