हृदय मुंबईला, यकृत अहमदाबादला; ब्रेनडेड युवकाकडून ४ जणांना जीवनदान, ग्रीन कॉरिडॉरची मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 10:41 AM2023-05-29T10:41:58+5:302023-05-29T10:42:08+5:30

ब्रेनडेड झालेल्या एका १९ वर्षीय युवकाचे त्याच्या कुटुंबीयांनी अवयवदान केले होते.

heart to mumbai liver to ahmedabad brain dead youth donated life to 4 people | हृदय मुंबईला, यकृत अहमदाबादला; ब्रेनडेड युवकाकडून ४ जणांना जीवनदान, ग्रीन कॉरिडॉरची मदत

हृदय मुंबईला, यकृत अहमदाबादला; ब्रेनडेड युवकाकडून ४ जणांना जीवनदान, ग्रीन कॉरिडॉरची मदत

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : हृदय आणि यकृत रोपणाची शस्त्रक्रिया सुरू असलेल्या मुंबई व अहमदाबाद येथील रुग्णाला वेळेत अवयव पोहोचवून गोव्याने मुंबई आणि अहमदाबादचे हृदय जिंकले आहे. गोमेकॉतून दाबोळी विमानतळापर्यंत कमीतकमी वेळेत पोहोचविण्यासाठी पोलिसांनी ग्रीन कॉरिडॉर बनविला होता. गोमेकॉत ब्रेनडेड झालेल्या एका १९ वर्षीय युवकाचे त्याच्या कुटुंबीयांनी अवयवदान केले होते.

ब्रेनडेड झालेल्या रुग्णाचे अवयव काढल्यानंतर, ते गरजू रुग्णांपर्यंत पोहोचविण्याचे काम राष्ट्रीय अवयव व टिश्यू रोपण समिती (नोटो) आणि राज्य अवयव व टिश्यू रोपण समिती (सोटो) यांच्या समन्वयाने होत असते. शस्त्रक्रिया सुरू असलेल्या रुग्णापर्यंत योग्य वेळी पोहोचविण्याचे काम अनेक यंत्रणांच्या समन्वयातून केले जाते. गोमेकॉचे डीन व सोटोचे संचालक डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हृदय मुंबईला पाठविण्यात आले आहे आणि यकृत अहमदाबाद येथे पाठविण्यात आले आहे.

या प्रक्रियेसाठी विविध विभागांनी समन्वयाने काम केले. पोलिसांनी हे अवयव तातडीने त्या-त्या ठिकाणी जावेत यासाठी ग्रीन कॉरिडॉरची व्यवस्था केली होती.

कहाणी दात्याची

उत्तर प्रदेशमधील १९ वर्षीय युवक हा गोव्यात काम करीत असताना इमारतीवरून खाली पडला होता. गोमेकॉत उपचार सुरू असतानाच, तो ब्रेनडेड अवस्थेत पोहोचला. सोटोचे संचालक डॉ. बांदेकर यांनी त्याच्या कुटुंबीयांना वस्तुस्थिती समजावून सांगताना, या मुलाचे आयुष्य २ दिवसांपेक्षा अधिक नसल्याचे सांगितले, तसेच या स्थितीत तो मुलगा अवयवदान करून, ४ लोकांना कसे जीवनदान देऊ शकतो आणि वेगळ्या स्वरुपात कसा जिवंत राहू शकतो, याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी अवयवदानास होकार दिला. सोमवारी त्याचे अवयव काढून ते योग्य ठिकाणी पोहोचविण्यात आले.

पोलिसांची तत्परता

अवयव गोमेकॉतून दाबोळीपर्यंत पाठविण्यासाठी नॉनस्टॉप वाहन जाण्यासाठी रस्ता मोकळा करून देण्याची गरज असते, याला ग्रीन कॉरिडॉर असे म्हणतात. गोवा पोलिसांनी हे काम यशस्वीरीत्या केले.

एकाच वेळी ४ शस्त्रक्रिया

रविवारच्या अवयवदानाने ४ जणांना जीवदान दिले असून, त्यासाठी एकाचवेळी चारपेक्षा अधिक शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. अवयव काढण्याची आणि काढलेले अवयव रोपणाच्या तीन शस्त्रक्रिया त्याच दिवशी कराव्या लागल्या. हृदयाचे रोपण मुंबईतील रिलायन्स इस्पितळात ५१ वर्षीय महिलेसाठी तर यकृत अहमदाबाद येथील सीआयएमएस इस्पितळातील ४७ वर्षीय पुरुषासाठी रोपण केले. मूत्रपिंडाचे गोमेकॉतच एकास रोपण करण्यात आले. तर मूत्रपिंड रोपणाची दुसरी शस्त्रक्रिया सोमवारी होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.

 

Web Title: heart to mumbai liver to ahmedabad brain dead youth donated life to 4 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा