राज्यात मुसळधार! सर्वत्र पडझड, पूरस्थिती निर्माण, दोन दिवस रेड अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2024 02:47 PM2024-07-14T14:47:03+5:302024-07-14T14:47:16+5:30
मुसळधार पावसाने रस्ते पाण्याखाली गेले, अनेक ठिकाणी पडझड झाली लोकांच्या घरात पुराचे पाणी शिरले.
नारायण गावस
पणजी: राज्यात पावसाचा हाहाकार सुरु असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसाने रस्ते पाण्याखाली गेले, अनेक ठिकाणी पडझड झाली लोकांच्या घरात पुराचे पाणी शिरले. राज्यात हवामान खात्याने रविवार सोमवार रेड अलर्ट जारी केला असून लाेकांनी सर्तक राहण्याचा इशाराही खात्याने दिला आहे. तसेच राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणनेही लोकांना मदतीसाठी नंबर जाहीर केला आहे.
सर्वत्र पडझड सुरुच
राज्यात गेल्या आठवडाभर पाऊस सुरुच आहे. पण शनिवार रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरुच आहे. आज रविवार सार्वजनिक सुट्टी असूनही मुसळधार पाऊस पडत असल्याने लोकांना घरापासून बाहेर पडता आले नाही. सर्व रस्त्यांवर गुडघाभर पाणी भरले आहे. नद्यांची पातळी वाढली आहे. बहुतांश ठिकाणी रस्ते पाण्यात गेल्याने अनेक वाहनांना याचा त्रास झाला. तसेच राज्यभर पडझडीच्या मोठ्या घटना घडल्या.
धरणे नद्यांची पातळी भरली
राज्यात मुसळधार पडत असलेल्या पावसाने धरणे नद्या भरल्या आहेत. तिळारी तसेच अंजूणे धरण भरायला आल्याने या धरणातून आज रात्रीपर्यंत पाणी साेडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदी शेजारील गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. जलस्त्राेत खात्याकडून या धरणाच्या पाण्याची पाहणी केली जात आहे. त्याचबरोबर राज्यातील सर्व नद्यांची पाण्याची पातळी वाढली असल्याने राेद्र रुप धारण केले आहे.
आज उद्या रेड अलर्ट
राज्यात हवामान खात्याने रविवार तसेच सोमवार रेड अर्लट जारी केला आहे. तसेच पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. राज्यात पावसाचे प्रमाण वाढले आहे. या मुसळधार पावसाने माेठी हानीही केली असून अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. लाेकांच्या घराच्या भिंती कोसळून माेठी नुकसान झाली आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आपत्काली न परिस्थिती ०८३२ -२४१९५५०, २२२५३८३, २७९४१०० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.