अतिवृष्टीचे ढग; रेड अलर्ट जारी, मान्सून तूट भरून निघाली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 08:47 AM2023-07-06T08:47:54+5:302023-07-06T08:48:32+5:30

राज्यभरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आले होते. 

heavy rain clouds red alert issued monsoon deficit filled | अतिवृष्टीचे ढग; रेड अलर्ट जारी, मान्सून तूट भरून निघाली

अतिवृष्टीचे ढग; रेड अलर्ट जारी, मान्सून तूट भरून निघाली

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : राज्याला बुधवारी पावसाने अक्षरशः झोडपून काढले तसेच दिवसभरात "अनेक ठिकाणी अतिवृष्टीचे संकेत देणारा रेड अलर्टही भारतीय हवामान खात्याने जारी केला आहे. या मान्सून हंगामात गोव्यासाठी जारी करण्यात आलेला हा पहिलाच रेड अलर्ट आहे. काल सकाळपासून राज्यभरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आले होते. 

अनेक ठिकाणी वाहतूक खोळंबली होती, तर काही भागात पडझडीच्या घटनाही घडल्या आहेत. हवामान खात्याने सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. पावसाचा जोर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. बुधवारी ८.३० पर्यंतच्या २४ तासात ४ इंच पाऊस पडला. त्यानंतरही म्हणजे सकाळी ८.३० वाजल्यानंतर रात्री ८.३० वाजेपर्यंतच्या १२ तासांत सरासरी मडगाव, केपे, म्हापसा या भागात ३.५ इंच अधिक पाऊस पडला. रात्री उशिरापर्यंत तो ४ इंच इतका झाला होता. त्यामुळे मान्सूनची तूट १०० टक्के भरून निघाली आहे. कारण सकाळपासून पडलेला पाऊस गृहीत धरता राज्यात हंगामी सरासरी पाऊस ४५ इंच पार झाला आहे. 

मडगाव व केपे भागात पावसाने अक्षरशः झोडपून काढले. पणजीतही जोरदार पाऊस पडल्यामुळे दयानंद बांदोडकर मार्ग, मिरामार परिसर पाण्याखाली गेला होता. १८ जून रस्ताही काही काळासाठी बुडाला होता. इतर ठिकाणी झालेल्या पडझडीत नेरूल येथे पार्क करून ठेवलेल्या कारवर माड पडल्यामुळे कारचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी वाहतूकही खोळंबली होती. 

मडगाव, केपेत ५० इंच पार दक्षिण गोव्यात यंदा जोरदार पाऊस पडला. त्यातही मडगाव आणि केपेत सर्वाधिक पाऊस पडला आहे. बुधवारी सकाळी ८.३० नंतरच्या १२ तासात मडगावात ३.१ आणि केपेत ३ इंचाहून अधिक पाऊस पडला. त्यामुळे मडगावात हंगामी पाऊस ५४ इंच पार, तर केपेत ५१ इंच पार झाला आहे.

सतर्क व्हा, सज्ज राहा...

हवामान खात्यातर्फे लोकांना आणि प्रशासनाला वेगवेगळ्या सूचना देण्यासाठी वेगवेगळे अलर्ट जारी केले जातात. त्यात सर्वात धोकादायक अलर्ट हा रेड अलर्ट' असतो. याचा अर्थ आता परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी प्रत्यक्ष कृती करा. जोरदार वृष्टी होण्याची शक्यता असल्यास आणि विशेष करून ठरावीक क्षेत्रात (आयसोलेटेड) अतिवृष्टीची शक्यता असल्यास हा अलर्ट जारी केला जातो. त्यापूर्वीचा ऑरेंज अलर्ट हा कोणत्याही परिस्थितीस तोड देण्यास सज्ज होण्याचे संकेत देतो.

काय आहे हवामान खात्याचा इशारा?

- रस्ते, मैदाने व इतर ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता
- सखल भागात असलेल्या घरात पाणी शिरण्याची शक्यता
- काही ठिकाणी कमकुवत इमारती व झाडे कोसळण्याची शक्यता
- वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता
- पूरसदृश स्थिती उद्भवण्याची शक्यता
- दरडी कोसळण्याच्या शक्यता
- सूर्य ढगांनी झाकोळला जाऊन अंधारमय स्थिती असण्याची शक्यता

 


 

Web Title: heavy rain clouds red alert issued monsoon deficit filled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.