अतिवृष्टीचा इशारा; सातव्या दिवशीही राज्यभर पावसाचे थैमान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 02:58 PM2023-07-24T14:58:50+5:302023-07-24T14:59:34+5:30

गोव्यात पुराची धास्ती

heavy rain warning even on the 7th day it rained all over the state | अतिवृष्टीचा इशारा; सातव्या दिवशीही राज्यभर पावसाचे थैमान

अतिवृष्टीचा इशारा; सातव्या दिवशीही राज्यभर पावसाचे थैमान

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : राज्यात पावसाचे थैमान सतत सातव्या दिवशीही चालूच आहे. रविवारी अवघ्या चार तासात दीड इंचाहून अधिक पाऊस पडला. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती कायम आहे. रविवारी जोरदार सरी बरसल्या. दरम्यान, आज सोमवारी राज्यात अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. काही ठिकाणी २४ तासात ७ इंचाहून अधिक पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे पूरस्थिती उत्पन्न होण्याची शक्यताही वर्तविली आहे.

सतत सातव्या दिवशी जोरदार पावसाने नद्या व उपनद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे सोमवारी अतिवृष्टी झाल्यास पूर येण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. राज्यात सकाळी 4.30 वाजेपर्यंतच्या २४ तासात राज्यात सरासरी पावणेचार इंच पाऊस पडला. त्यामुळे राज्यात सरासरी पाऊस ८४ इंच पार झाला आहे. सत्तरी आणि डिचोली तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडत असल्याची माहितीही हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासात साखळीत ५ इंच पाऊस नोंद झाला. पावसाबरोबर जोरदार वाराही सुटल्यामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. 

उत्तर गोव्यात सर्वाधिक नोंद झाली असली तरी सासष्टीतही पावसाने पडझड झाली. कोलवाळ येथे कारवर झाड पडून कारचे नुकसान झाले. अशीच एक घटना बोरी येथे घडली असून दोन झाडे कोसळल्याने कारची मोडतोड झाली आहे. पेडणेत अनेक झाडे कोसळल्यामुळे वीज वाहिन्या तुटून पडल्या. सुदैवाने जिवितहानी झालेली नाही. धुळेर- म्हापसा येथे झाड कोसळल्यामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. उंडीर येथे एका झोपडीवर माड कोसळला. गोवा बेळगाव महामार्गावरील लोंढा येथे बांधलेला पूल खचून त्याला तडे गेल्याचेही वृत्त आहे. हरमल येथील पोलीस आऊट पोस्टकडे जाणारी पायवाटच पावसाने वाहून जाण्याची घटना घडली.

कुळेत बंधारे पाण्याखाली 

कुळे येथे संततधार पावसामुळे नदीच्या पातळीत वाढ झालेली आहे. मेटावाडा येथील पुलाजवळील दुधसागर नदीत असलेला बंधारा बुडालेला आहे. दूधसागर नदीचे पाणी गणपती विसर्जन शेडपर्यंत पोहचले आहे. नदीचे पाणी अत्यंत गढूळ झाले असून परिसरात वीज खंडित होण्याचा प्रकार घडत आहे. दूधसागर नदीतून पाणी पंपाद्वारे उपसा होत नसल्याने कुळेवासियांना नळातून पाणी मिळाले नाही. त्यामुळे लोकांचे खूपच हाल झाले. असाच जर पाऊस पडत राहिल्यास परिसरात पूर येण्याची शक्यता आहे. 

सासष्टीत झाडे, घराची भिंत कोसळली

मुसळधार पावसाने पावसात सासष्टीत चार ठिकाणी झाडे घरावर आणि रस्त्यावर पडण्याच्या घटना घडल्या. तर एका ठिकाणी घराची भिंत कोसळून नुकसान झाले. पावसाने जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले. ताळभाटी येथे एका घरावर झाड पडून ९५ हजारांची हानी झाली. 

अँथनी फर्नांडीस यांच्या मालकीचे हे घर आहे. येथे मडगाव अग्निशामक दलाच्या जवानांनी नंतर घटनास्थळी जाऊन झाडाच्या फांद्या हटविताना १ लाख २० हजार रुपये किमतीची मालमत्ता वाचवली, फान्राडे येथे एक झाड वीज खांब्यावर पडले तर मालभाट येथे रॉलंड डिक्रूझ यांच्या घरावर झाड पडले. वार्का येथे दायमादीन रॉड्रिग्स यांच्या घराची भिंत कोसळली त्यात अंदाजे २० हजारांची हानी झाली. आर्ले जंक्शन येथे रस्त्यावर झाड पडले हटवण्यात आले.

उगेतील देसाईवाडा भागात पडझड 

सांगे उगे पंचायत क्षेत्रातील देसाईवाडा भागात जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्याने झाडांची पडझड होऊन घरांची मोडतोड झाली आहे. नेत्रावळी येथे सावरी प्रभागात आंब्याचे झाड माडावर आणि माड घरावर पडल्याने घराचे नुकसान झाले. देसाईवाडा उगे येथे संजय देसाई यांच्या घराशेजारील आंब्याचे झाड सार्वजनिक मांडासह संजय देसाई, राहुल देसाई यांच्यासह आणखी दोघांच्या घरावर पडले. सुदैवाने जीवित हानी झाली नसल्याचे संजना देसाई यांनी सांगितले.

केसरी अलर्ट कायम 

पावसाचा धडाका हा गुरुवारपर्यंत चालणार असल्याचे संकेत हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजावरून मिळत आहे. या चार दिवसात काही ठिकाणी अतिवृष्टीचाही इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. चार दिवसांसाठी केसरी अलर्टही जारी करण्यात आला आहे.

बार्देशात पडझडच जास्त

सतत पडणाऱ्या वादळी पावसामुळे. जोरदार वाऱ्यामुळे बार्देश तालुक्यातील अनेक ठिकाणी झाडांची व घरांची पडझड झाली. या घटनांमध्ये जीवित हानी झाली नसली तरी मालमतेचे मोठे नुकसान झाले. सुमारे सात ठिकाणी झाडे कोसळली. धुळे येथे रस्त्यावर मोठे झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली.

डिचोलीत कहर

तालुक्यातील सर्वच नद्या-नाल्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत आले आहे. पूरस्थिती असल्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. साखळीत वाळवंटी अस्नोड्यातील पार नदी, डिचोली आणि शापोरा या नद्यांच्या पाणीपात्रात मोठी वाह सुरू आहे. सध्या नटीची पातळी ४०.२० मीटर असून धोका पातळी ४३ मीटर आहे.

सत्तरी तालुक्यात जोर कायम

होंडा सत्तरी तालुक्यात पावसाचा जोर कायम असल्याने नद्यांचे पाणी पात्राबाहेर येवू लागले आहे. जनजीवन विस्कळीत झाले असून झाडे कोसळण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. पिसुर्ले पंचायत क्षेत्रातील पणसे भागात रेश्मा गावडे यांचे घर पहाटे तीनच्या सुमारास कोसळल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

वळवईत फेरी बंद

वळवई सावईवेरे भागात गेले पाच-सहा दिवस सतत पडलेल्या पावसामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सलग पडलेल्या पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. वळवईत पाण्याला जोर असल्याने फेरी बंद ठेवण्यात आली आहे.

उणय, दूधसागर नदीने ओलांडली धोक्याची पातळी

दाभाळ संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे निरंकाल व दाभाळ गावातून वाहणाऱ्या उणय नदीने व कोडली, दावकोण, धुलैय कुंभारवाडा, शिग्नेव्हाळ आदी गावातून वाहणाया दूधसागर नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने नागरिकामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सलग दुसऱ्या दिवशीही पेण्यामळ- निरंकाल भागातील मुख्य रस्ता पाण्याखाली गेल्याने निरंकाल व दाभाळ गावचा संपर्क तुटला दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे बंद झाल्याने वाहतूक धारबांदोडा मार्गे किंवा पाज, बिबळ, वागोण मार्गे पर्यायी लांब पल्ल्याच्या रस्त्याने वळवावी लागली.

खबरदारी घ्या

कमकुवत वृक्षाखाली थांबू नका. नदीच्या पाण्याने रस्त्याची- पातळी गाठल्यास त्यावरून वाहने चालवू नका. वीजतारा तुटून पडू शकतात. जवळ जाणे टाळा.  छताचे पत्रे उडून जाऊ शकतात. दिवसा अंधारून येण्याची शक्यता, काळजी घ्या. समुद्रावर जाऊ नका.
 

Web Title: heavy rain warning even on the 7th day it rained all over the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.