राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा दणका; ठिकठिकाणी पडझडीमुळे जनजीवन विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2023 06:27 PM2023-10-15T18:27:35+5:302023-10-15T18:27:47+5:30
राज्याला रविवारी परतीच्या पावसाचा दणका बसला.
नारायण गावस
पणजी : राज्याला रविवारी परतीच्या पावसाचा दणका बसला. राज्यातील अनेक भागात जाेरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडल्याने माेठ्या प्रमाणात पडझड झाली. सत्तरी डिचाेली, बार्देश, पेडणे, तिसवाडीसह संपूर्ण उत्तर गोव्याला या जाेरदार वादळाचा फटका जाणवला. दुपारी सुरु झालेल्या या मुसळधार पावसामुळे अनेक झाडे उन्मळून घरावर पडली.
अनेक भागात वीज गुल
राज्यात परतीच्या पावसामुळे वादळाचा जाेरदार फटका बसल्याने वीज खांबावर झाडे पडल्याने वीज तारा तुटल्या अनेक भागात रविवारी वीज गुल झाली. माेठ माेठी झाडे उन्मळून पडल्याने अग्नीशमक दल तसेच वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली. वादळामुळे सर्वत्र मोठे नुकसान झाले होते.
शेती बागायतीची माेठी हानी
वादळी पावसामुळे शेती बागायतींची माेठी हानी झाली. सत्तरी, डिचाेली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या केळीच्या बागायती नष्ट झाल्या. काजू कलमांची माेडतोड झाली तसेच झेंडूच्या फुलांच्या बागायतींचे नुकसान झाले. भात शेतीच्या बागायती पाणी घुसल्याने शेतीची नाशाडी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना माेठी नुकसान सहन करावी लागेल.
पावसासह वादळाचा जोर कायम राहणार
पुढील दोन आठवड्यांत अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे २० ते २६ ऑक्टोबर दरम्यान गोव्यासह संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर अधिक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. तसेच चक्री वादळेही निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे. राज्यात साधारणपणे १५ ऑक्टोबरपर्यंत मान्सून अधिकृतरित्या माघार फिरतो. यंदा राज्यात मान्सून उशिराने दाखल झाल्याने परतीचा पाउस उशीरा जाण्याची शक्यता आहे.