हेल्मेटसक्ती महामार्गांवरच
By admin | Published: September 16, 2014 01:17 AM2014-09-16T01:17:01+5:302014-09-16T01:22:40+5:30
मुख्यमंत्र्यांची भूमिका : येत्या महिन्यापासून कठोर अंमलबजावणी
पणजी : केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार दुचाकी चालविणाऱ्या व दुचाकीच्या मागे बसलेल्या व्यक्तीसाठी हेल्मेट सक्तीचे आहेच. तथापि, या सक्तीची जोरदार अंमलबजावणी येत्या महिन्यापासून प्रथम महामार्गांवरच केली जाईल, अशी भूमिका मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सोमवारी जाहीर केली.
दि. २ आॅक्टोबरपासून राज्यातील सर्व रस्त्यांवर दुचाकीचालक व मागे बसलेला प्रवासी या सर्वांसाठी हेल्मेटसक्तीची जोरदार अंमलबजावणी केली जाईल, असे गेले काही दिवस वाहतूक खाते सांगत आहे. वाढत्या अपघातांमध्ये दुचाकीस्वार व मागे बसलेली व्यक्ती यांचे बळी जात असल्याने आपण ही उपाययोजना करत असल्याचे वाहतूक खात्याचे म्हणणे आहे. याबाबत दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या विषयी पत्रकारांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांना विचारले असता, ते म्हणाले की, हेल्मेटची सक्ती लोकांच्या हितासाठीच आहे. केंद्र सरकारच्या मोटार वाहन कायद्यात हेल्मेटसक्तीची तरतूद आहे. आता या सक्तीची जोरदारपणे अंमलबजावणी करावी की नाही, एवढाच प्रश्न आहे. आम्ही प्रथम महामार्गांवरच चालक व सहप्रवासी अशा दोघांसाठी ही हेल्मेटसक्ती करू. अंतर्गत भागांतील रस्त्यांवर करणार नाही. महामार्गावर तरी हेल्मेटचा वापर करण्यास कुणाचा आक्षेप नसेल. मोटरसायकल पायलटांचा तेवढाच थोडा प्रश्न निर्माण होईल. मोटरसायकलच्या मागे बसणारे प्रवासी दुसऱ्याच्या डोक्यावरचे जुने हेल्मेट वापरण्यास तयार नसतात हे खरे आहे.
(खास प्रतिनिधी)