'विकसित गोवा' करण्यासाठी साहाय्य करा; मुख्यमंत्र्यांचे साकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2024 01:40 PM2024-06-25T13:40:26+5:302024-06-25T13:40:49+5:30
CM सावंत यांनी या दौऱ्यात अन्य केंद्रीय मंत्र्यांच्याही गाठीभेटी घेतल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा विराजमान झाल्याबद्दल अभिनंदन केले व 'विकसित गोवा'चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन व पाठिंबा द्यावा, अशी विनंती केली.
सावंत यांनी या दौऱ्यात अन्य केंद्रीय मंत्र्यांच्याही गाठीभेटी घेतल्या, केंद्र सरकारच्या 'विकसित भारत २०४७' संकल्पनेच्या धर्तीवर गोवा सरकारने 'विकसित गोवा'चे उद्दिष्ट ठेवले आहे. रस्ते, पूल आदी पायाभूत सुविधांसह इतर विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारची मदत लागेल. मुख्यमंत्र्यांनी या अनुषंगानेच मोदींना साकडे घातले आहे.
मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन खनिज वाहतूक, वाळू, उपसा, सीआरझेड, सीझेडएमपी आदी प्रश्नांवर चर्चा केली, दरम्यान, सावंत यांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली, केंद्रीय मंत्री म्हणून पुढील कार्यकाळासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
सरकारने नऊ खाण ब्लॉकचा लिलाव केला. काही कंपन्यांनी ईसी वगैरे मिळवल्या; परंतु, कोर्टाच्या निर्बंधांमुळे गावांमध्ये खनिज वाहतूक सुरू करता आलेली नाही. दुसरीकडे सीआरझेडमुळे वाळूउपसा तसेच किनारी भागातील बांधकामांवर संकट आले आहे. राज्यात वाळूची टंचाई आहे. गोव्यात पश्चिम घाटातील ९९ गावे पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील अधिसूचित केलेली आहेत. यातील ४० गावे वगळण्याची राज्य सरकारची मागणी आहे.
भूपेंद्र यादव यांच्याशी खनिज वाहतुकीवर चर्चा
मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन खनिज वाहतूक, वाळूउपसा, सीआरझेड, सीझेडएमपी आदी प्रश्नांवर चर्चा केली. तसेच गोव्यात पश्चिम घाटातील पर्यावरणीयदृष्ट्वा संवेदनशील म्हणून अधिसूचित केलेल्या गावांचा विषयही मांडला. गावांमध्ये खनिज वाहतूक सुरू करण्यासाठी कायदेशीर तोडगा काढण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली. यादव यांच्या भेटीवेळी मुख्यमंत्र्यांसोबत राज्याचे पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्चेरा हेही होते.
गडकरींना निमंत्रण
मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचीही भेट घेतली. मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळापासून राष्ट्रीय महामार्ग ६६ ला जोडणाऱ्या सहापदरी लिंक रोडच्या उद्घाटनासाठी आणि एमईएस कॉलेज जंक्शन ते बोगमाको जंक्शनपर्यंत चौपटरी कनेक्टिव्हिटी मार्गाच्या पायाभरणीसाठी गडकरी यांना मुख्यमंत्र्यांनी निमंत्रित केले आहे.