गोव्यातील वारसास्थळांकडे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी लवकरच वारसा महोत्सव - बाबू कवळेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 05:38 PM2019-12-19T17:38:37+5:302019-12-19T17:41:27+5:30
गोव्यातील पुरातत्व खात्यातर्फे जे दस्तावेज आहेत त्यांचे इंग्रजी भाषेत भाषांतर करुन ते डिजिटीलायझेशन पद्धतीने सांभाळून ठेवले जातील.
मडगाव - गोव्यातील ऐतिहासिक वारसास्थळांचे संवर्धन हाती घेण्याची योजना राज्य सरकारने तयार केली असून या ऐतिहासिक स्थळांकडे पर्यटक व लोकांना आकर्षित करण्यासाठी लवकरच मोठ्या प्रमाणावर ‘वारसा महोत्सवाचे’ आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पुरातत्व खाते सांभाळणारे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी गुरुवारी दिली.
गोवा मुक्ती दिनानिमित्त गुरुवारी मडगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या सोहळ्यात झेंडावंदन केल्यानंतर बोलताना कवळेकर यांनी ही माहिती दिली. गोव्यातील पुरातत्व खात्यातर्फे जे दस्तावेज आहेत त्यांचे इंग्रजी भाषेत भाषांतर करुन ते डिजिटीलायझेशन पद्धतीने सांभाळून ठेवले जातील. दक्षिण गोव्यातील लोकांना हे दस्तावेज उपलब्ध व्हावेत यासाठी केपे येथे पुरातत्व खात्याचे कार्यालय उघडले जाईल असे त्यांनी सांगितले.
कवळेकर यांच्याकडे शेती खातेही असून या खात्यामार्फत गोव्यात सेंद्रीय शेतीला प्राधान्य दिले जाईल असे सांगतानाच हे काम अंतिम टप्प्यावर पोचले आहे. युवकांनी शेतीकडे आकर्षित व्हावे यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याबरोबरच शेती व्यवसायाची पर्यटनाशी जोड घालण्याची योजनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. कारखान्यात काम करणा:या कामगारांच्या सुरक्षेसाठी गोव्यातील सर्व कारखाने, कारखाने व बाष्पक कायद्याखाली नोंद केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सुरुवातीला कवळेकर यांनी लोहिया मैदानावरील लोहियांच्या पुतळ्याला फुले अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या संचलनाची पहाणी केली. यावेळी आमदार चर्चिल आलेमाव, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, विल्फ्रेड डिसा, क्लाफासियो डायस, माजी मंत्री आवेर्तान फुर्तादो, मडगावच्या नगराध्यक्ष पूजा नाईक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व अन्य मान्यवर उपस्थित होते. त्यापूर्वी सकाळी कवळेकर यांनी आपल्या बेतूल येथील निवासस्थानी झेंडावंदन केले.