बायणातील २०५ झोपड्या पाडण्यास हायकोर्टाची स्थगिती
By admin | Published: April 16, 2015 01:26 AM2015-04-16T01:26:28+5:302015-04-16T01:26:41+5:30
वास्को : बायणा येथील समुद्रकिनाऱ्याजवळ देस्तेरोवाडा जवळची ८४ घरे काल (बुधवारी) दुपारपर्यंत पोलीस संरक्षणात जमीनदोस्त करण्यात आली
वास्को : बायणा येथील समुद्रकिनाऱ्याजवळ देस्तेरोवाडा जवळची ८४ घरे काल (बुधवारी) दुपारपर्यंत पोलीस संरक्षणात जमीनदोस्त करण्यात आली. इतर २०५ झोपडीवजा घरे पाडण्यास उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने पुढील कारवाई सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आली आहे़
बायणा येथील समुद्रकिनाऱ्याजवळच्या सुमारे दोन ते तीन कि़मी़ लांबीच्या राष्ट्रीय चौपदरी रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार असल्याने त्यापूर्वी बायणा किनाऱ्याजवळील घरे पाडणे सुरू झाले आहे. बायणा किनारपट्टीजवळील २०५ तसेच इस्पितळामागील ८४ घरे कारवाईच्या यादीत आहेत़ यापैकी बहुतेकजणांचे राज्य शासनाने पुनर्वसन केलेले असून इतरांचेही योग्य पद्धतीने पुनर्वसन करावे यासाठी कर्नाटकातील काँग्रेस पक्षाचे आमदार ए़एस़ पाटील गेल्या काही दिवसांपासून बायणामध्ये ठाण मांडून आहेत.काँग्रेस पक्षाच्या नेत्यानींही हा प्रश्न सध्या उचलून धरल्यामुळे जनतेचे लक्ष शासनाच्या कारवाईकडे लागून राहिले आहे़
बायणा येथील रवींद्र भवन परिसरात सर्व अधिकारी एकत्र आल्यानंतर कारवाईला सुरुवात झाली़ सकाळी ७ पासून पोलिसांनी बायणा परिसराचा ताबा घेतला. वरिष्ठ सरकारी अधिकारी एकत्र आल्याने ८़३० वाजता इस्पितळामागील घरांवर जेसीबी फि रविण्यास सुरुवात केली़ दक्षिणेच्या बाजूने तीन, तर उत्तरेच्या बाजूने एकूण पाच जेसीबींचा वापर करून कारवाई सुरू करण्यात आली़ या वेळी संबंधित घरातील माणसे उभी राहून घरे जमीनदोस्त होताना पाहत होती़ काही जणांचे स्वत:ची घरे जमीनदोस्त होताना डोळे पाणावले होते़ दुपारी १़३० वाजता कारवाई संपल्यानंतर प्रत्येक घरमालक पाडलेल्या घराच्या ठिकाणी येऊन घराचे अवशेष पाहत होते़ बहुतेकजणांनी दोन दिवसांपूर्वीच घरातील सामान अन्य ठिकाणी नेऊन घरे खाली केली होती, तर काहीजणांनी कौले काढून ठेवली होती़ सामान भरून नेण्यासाठी अनेक ट्रक व कामगार आले होते़
कारवाई सुरू असताना मुरगावचे उपजिल्हाधिकारी गौरीश शंखवाळकर, काणकोणचे उपजिल्हाधिकारी सुदिन नातू, केपेचे उपजिल्हाधिकारी शंकर गावकर, मुरगावचे मामलेदार लक्ष्मीकांत देसाई, केपेचे मामलेदार मनोज कोरगावकर, मुरगावचे संयुक्त मामलेदार विनोद दलाल, फ ोंड्याचे संयुक्त मामलेदार अभिर हेदे, सालसेतचे संयुक्त मामलेदार जुवांव फ र्नांडिस, मडगावचे संयुक्त मामलेदार रमेश गावकर, केपेचे संयुक्त मामलेदार प्रताप गावकर, काणकोणचे संयुक्त मामलेदार दत्तराज देसाई, उपअधीक्षक लॉरेन्स डिसोझा, पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर (वास्को), कपील नायक (मुरगाव), शैलेश नार्वेकर (वेर्णा), राजू राऊत देसाई, रवी देसाई, प्रताप गावकर तसेच राष्ट्रीय महामार्गाचे कॉप फुर्तादो, सल्लागार पाणंदीकर तसेच वीज व पाणीपुरवठा खात्याचे अभियंता घटनास्थळी उपस्थित होते़
कर्नाटकचे पर्यावरणमंत्री आऱव्ही़ देशपांडे यांनी बायणातील कारवाईसंदर्भात बोलताना गोवा सरकारने माणुसकीच्या दृष्टीने बायणातील कुटुंबीयांना सहानुभूती दाखवून त्यांची अन्य ठिकाणी पर्यायी व्यवस्था करावी, अथवा त्यांच्यासाठी पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली आहे़
यासंबंधीची माहिती घेण्यासाठी कारवार जिल्ह्यातील जिल्हाधिकारी घोष यांना बायणा येथे पाठविण्यात आल्याचे त्यांनी जोयडा येथे पत्रकारांना सांगितले़ कर्नाटकातील आमदार ए़ एस़ पाटील यांनी बायणा येथे पत्रकारांना सांगितले की, कारवाईवेळी कुणीही विरोध न करता राज्य सरकारला पूर्ण सहकार्य करणार आहे़ शासनानेही बेघर झालेल्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)