‘गोंयच्या सायबा’च्या फेस्ताचा हिंदू चेहरा!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 12:29 PM2018-12-04T12:29:30+5:302018-12-04T12:29:54+5:30
जुने गोवेतील सेंट फ्रान्सिस झेवियरच्या फेस्ताचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा सर्वधर्मीय तोंडवळा होय.
जुने गोवे : जुने गोवेतील सेंट फ्रान्सिस झेवियरच्या फेस्ताचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा सर्वधर्मीय तोंडवळा होय. केवळ मतांवर डोळा ठेवणारे सर्व धर्मांचे राजकारणीच या फेस्ताला उपस्थिती लावतात असे नव्हे, तर भाविकांत आणि फेस्ताच्या फेरीत दुकाने थाटणारेही विविध धर्मीय असतात. यंदा तर तबब्ल ७५ टक्क्यांहून विक्रेते हे हिंदू धर्मीय असल्याचे दिसून आले. मेणबत्ती, नवस फेडण्यासाठी मेणापासून तयार केलेले मानवी अवयव, चणे, खाजे व अन्य पारंपरिक मिठाई तसेच बांगड्या विकणारे बहुतांशी हिंदूच आहेत. परंपरेने या वस्तूंची केवळ फेस्तासाठी म्हणून दुकाने थाटणारेही अनेक आहेत. एकंदर पाहाता ‘गोंयच्या सायबा’चे हे फेस्त म्हणजे गोव्यातील धार्मिक सहचर्याचे मनोज्ञ उदाहरण ठरावे. फेस्तानिमित्त गेल्या २४ तारीखपासून ‘नोव्हेना’ (प्रार्थना) सुरू झाल्या. ‘नोव्हेना’ नऊ दिवस चालतात. या एकूण काळात लाखो भाविकांची उपस्थिती असते. शेजारील महाराष्ट्र तसेच कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात भाविक या फेस्ताला येतात. कोल्हापूर, आजरा, गडहिंग्लज, नेसर्गी, मधवाल, देसनूर, बेळगाव, खानापूर भागातून चालत यात्रेकरू ख्रिस्ती भाविक गोव्यात येतात. केवळ गोव्यातील ख्रिस्ती भाविकच नव्हे, तर वरील भागातून येणारे यात्रेकरूही नवस करतात.
गेली तब्बल ३५ वर्षे या फेस्तात मेणबत्त्या तसेच मेणाच्या अवयवांचा स्टॉल लावणारे दिवाडी येथील जगन्नाथ रामा आखाडकर यांनी यंदाही गांधी पुतळ्याच्या डाव्या बाजूला मंडप लावला आहे. आपल्या व्यवसायाबद्दल माहिती देताना ते म्हणाले की, ‘ फेस्तासाठी मेणबत्त्या व मेणाचे अवयव बनविण्याचे काम आम्ही महिनाभर आधीच सुरू करतो मानवी हात, पाय, नाक, कान आदी अवयवाचे साचे तयार असतात. मेणापासून हे अवयव बनविले जातात व ते आम्ही किलोंनी विकतो. सध्या किलोचा दर ९00 रुपये आहे. दिवाडी येथील माझ्या कारखान्यात आठ ते दहा कामगार काम करतात. चतुर्थीसाठी लागणारे मेणाचे आयटम जूनपासून तयार करतो. पावसाळ्यात त्यानंतर दिवाळीसाठी लागणाºया मेणाच्या पणत्या, मेणबत्त्या आदी कामे हाती घेतो.’
आखाडकर पुढे म्हणाले की, जुने गोवे फेस्तानिमित्त २४ नोव्हेंबरपासून ‘नोव्हेना’ सुरू होतात. यंदा आम्ही २१ नोव्हेंबरला मंडप लावला असून साधारणपणे ६ डिसेंबरपर्यंत येथे राहणार आहोत. मेणाचे अवयव बनविण्याचे काम या मंडपातच केले जाते. त्यासाठी साचे आणले जातात. महिला कामगार हे काम करतात. आमच्याकडे किलोने मेणबत्त्या घेऊन भाविकांना या मेणबत्त्या चर्चच्या आवारात फिरून विक्रेते त्या त्यांचे दर लावून विकतात.’
घरात मेणाचा कारखाना चालतो तेव्हा पत्नी मनुजा याही त्यांना या व्यवसायात मदत करतात. गेली अनेक वर्षे या व्यवसायात असल्याने आखाडकर कुटुंबीय केवळ दिवाडी भागातच नव्हे तर जुने गोवे तसेच गोव्यात अनेक ठिकाणी परिचित आहे. जुने गोवेंच्या गांधी सर्कल भागात रस्त्यांवर फिरून भाविकांना मेणबत्त्या विकणारे विक्रेते त्यांच्याकडून घाऊक मेणबत्त्या घेतात. ते या विक्रेत्यांमध्ये ‘काका’ या टोपणनावाने परिचित आहे. १00 मेणबत्त्यांचा पुडा १३0 रुपये आहे.
आखाडकर म्हणाले की, ‘विक्रेते आमच्याकडून घाऊक माल नेतात आणि मनमानी दर लावतात. शिवाय ‘गोंयच्या सायबा’ला अर्पण केलेले अवयव मागील दाराने स्वस्तात विकण्याचेही प्रकार घडतात. त्यामुळे वाईट वाटते.’ मंडप, वाहतूक खर्च, मजूर यावर २५ हजारांहून अधिक रुपये खर्च होतात व कमी दरात माल देऊन परवडत नाही त्यामुळे यंदा दर ९00 रुपये किलो लावलेला आहे.
चणें, शेंगदाण्यांनाही मोठी मागणी
जत्रांमध्ये जसे ‘खाजें’ तसे फेस्तात ‘चणें’. फेस्ताला जाणारा भाविक ‘चणें’ घेऊनच घरी परततो. या फेस्तात चर्चच्या बाजुलाच अभिजित गंगाधर नाईक या कुंभारजुवें येथील व्यावसायिकाने चणे, शेंगदाण्यांचा स्टॉल लावला आहे. अभिजित म्हणाले की,‘ हा आमचा वडिलोपार्जित धंदा आहे. गेली १६ वर्षे आम्ही या फेस्तात स्टॉल लावतो.’ स्टॉलच्या मागील बाजूस चणे, शेंगदाण्यांसाठी भट्टी लावली जाते. चंदगड, बिहार येथील पाच ते सहा कामगार त्यांच्याकडे आहेत. फेस्ताच्या आधी महिनाभर चण्यांना उब लावून ठेवावी लागते. चणे मुंबईहून तर शेंगदाणे गुजरातहून आणतो, असे अभिजित यांनी सांगितले. या दिवसात शेंगदाण्यांनाही बरीच मागणी आहे, असे त्यानी सांगितले. अभिजित यांनी पोलिस दलातील आयआरबीची सरकारी नोकरी सोडून या व्यवसायात स्वत:ला झोकून दिले आहे. २0 नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत ५0 किलोची साधारणपणे ५0 पोती ‘चणें’ या फेस्तात आम्ही विकतो, असे त्यांनी एका प्रश्नावर सांगितले. फेस्तात सुमारे एक हजारहून अधिक चण्यांचे स्टॉल्स आहेत, अशी माहिती त्यानी दिली. ते म्हणाले की, ‘वाळपई तसेच अन्य ठिकाणी जत्रांमध्येही आम्ही चण्याचे स्टॉलस लावतो.’
दरम्यान, फेस्तात हिंदू विक्रेत्यांची संख्या जास्त असल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, ‘ख्रिस्ती बांधव व्यवसायाय, धंद्यात अभावानेच येतात त्यामुळे हिंदू विक्रेत्यांचे प्रमाण जास्त आहे.’
खाजें विक्रेत्यांचीही मोठी उलाढाल
फेस्तात खाजें विक्रेत्यांनीही स्टॉल्स लावलेले आहेत. तळावली येथील गोपिनाथ रायकर यांच्या मालकीच्या स्टॉलवर गरमगरम जिलेबी, मऊ बुंदीचे लाडू, खाजे तयार करुन विकले जाते. येथे १५ कामगार काम करतात. जिलेबी तळण्याचे काम करणारा सतीश गोपाळ सतरकर याने अश्ी माहिती दिली की, फेस्ताच्या या एकूण काळात सुमारे २0 क्विंटल खाजें विकले जाते. सध्या ‘खाजें’, ‘जिलेबी’ आणि ‘लाडू’ यांचा २८0 रुपये किलो हा समान दर ठेवला आहे.
फेस्तातील एकूण आढावा घेतला असता मुंबई तसेच अन्य ठिकाणहून आलेल्या विक्रेत्यांची संख्याही लक्षणीय असल्याचे दिसून आले. तयार कपडे, बॅगा तसेच अन्य वस्तूंची विक्री करणारे स्टॉल्स दाटीवाटीने उभे करण्यात आले आहेत. महिलांची या स्टॉल्सवर मोठी गर्दी दिसून येते. सोमवारी दिवसभर हजारोंच्या संख्येने भाविकांनी या फेस्ताला उपस्थिती लावली.