राष्ट्रीय स्पर्धेच्या ऐतिहासिक टॉर्च रिलेचे मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन
By समीर नाईक | Published: October 10, 2023 06:00 PM2023-10-10T18:00:40+5:302023-10-10T18:00:59+5:30
३७व्या राष्ट्रीय स्पर्धेसाठीच्या ऐतिहासिक टॉर्च रिलेचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते मंगळवारी पर्वरी येथील सचिवालयाच्या परिसरात करण्यात आले.
पणजी : ३७व्या राष्ट्रीय स्पर्धेसाठीच्या ऐतिहासिक टॉर्च रिलेचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते मंगळवारी पर्वरी येथील सचिवालयाच्या परिसरात करण्यात आले. यावेळी क्रीडामंत्री गोविंद गावडे, क्रीडा सचिव स्वेतिका सच्चन, एसएजी संचालक डॉ. गीता नार्वेकर, क्रीडा आणि युवक व्यवहार संचालनालयाचे संचालक अरविंद खुटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
टॉर्च रिलेची सुरुवात करताना मला खूप अभिमान वाटत आहे. गोव्यासाठी ही मोठी गोष्ट आहे. ऐतिहासिक टॉर्च रिले ही खिलाडूवृत्तीच्या चिरंतन ज्योतीचे प्रतीक असून ऍथलेटिक उत्कृष्टतेच्या वचनबद्धतेला मूर्त रूप देते. या प्रतिष्ठित क्रीडा स्पर्धेच्या सर्वोत्तम आयोजनासाठी गोवा पूर्णपणे तयार आहे, असे यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रीय स्पर्धेसाठीची टॉर्च रिले आपल्या सुंदर राज्यातील सर्व १२ तालुक्यांतून प्रवास करेल आणि सर्व प्रमुख पर्यटन स्थळांना कव्हर करेल, राष्ट्रीय खेळांचा उत्साह वाढवेल आणि या भव्य कार्यक्रमात ग्रामीण भागांचा समावेश असेल. टॉर्च रिलेमध्ये क्रीडापटूची कधीही न संपणारी ज्योत आहे. टॉर्च रिले ही २५ ऑक्टोबर रोजी पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे पोहचणार आहे. तर २६ ऑक्टोबर रोजी उद्घाटन समारंभाच्या अगोदर मशालचा अंतिम मुक्काम असेल. तोपर्यंत सर्व १२ तालुक्यांमधील प्रमुख पर्यटन स्थळांचा प्रवास टॉर्च रिले करेल, असे क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले.
यावर्षी, गोवा आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करून इतिहास रचण्यासाठी सज्ज आहे. या स्पर्धेत ४३ क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. तसेच या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये अनेक नवीन खेळांचे पदार्पण होणार आहे. त्यात बीच फुटबॉल, रोलबॉल, गोल्फ, सेपाक टकराव, स्काय मार्शल आर्ट्स, कलारिपायट्टू आणि पेनकॅक सिलाट या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. शिवाय, नौकानयन आणि तायक्वांदो खेळ मागील आवृत्तीत नव्हते. मात्र यंदाच्या स्पर्धेद्वारे पुनरागमन करत आहेत. परंपरा आणि संस्कृतीला मान्यता देत, लगोरी आणि गटका या खेळांचा प्रात्यक्षिक खेळ म्हणून समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे कार्यक्रमाला एक अनोखा आयाम जोडला गेला आहे.