म्हादईसाठी कर्नाटकात सभा घ्या; रिव्होल्युशनरी गोवन्सचे प्रदेश काँग्रेसला जाहीर आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2023 09:54 AM2023-07-09T09:54:02+5:302023-07-09T09:56:15+5:30
कॉंग्रेस व बीजेपी या दोन्ही पक्षांनी राजकीय स्वार्थासाठी म्हादईचे राजकारण केले.
पणजी : म्हादईचे पाणी वळवण्यासाठी कर्नाटक उभारत असलेल्या कथित कळसा भंडुरा प्रकल्पाविरोधात आता कर्नाटकातच गोवा काँग्रेसच्या नेत्यांना सभा घ्यावी. या सभेला रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचा पूर्ण पाठिंबा असेल, असे आव्हान आरजी नेते मनोज परब यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे.
सेव्ह म्हादई सेव्ह गोवाचे नेते अॅड. हृदयनाथ शिरोडकर व महेश म्हांबरे हे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारीही आहेत. मात्र कर्नाटकमध्ये काँग्रेस सत्तेत आल्यापासून शिरोडकर व म्हांबरे म्हादई विषय तेथील सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात एक शब्दही काढत नाही. त्याचा निषेध असल्याचेही परब यांनी स्पष्ट केले.
परब म्हणाले की, कॉंग्रेस व बीजेपी या दोन्ही पक्षांनी राजकीय स्वार्थासाठी म्हादईचे राजकारण केले. सेव्ह म्हादई सेव्ह गोवा या अभियानात काँग्रेसचे सदस्य आहेत. मात्र कर्नाटकात त्यांचे सरकार आल्यापासून ते गप्प आहेत. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने म्हादईचा लढा कर्नाटकात नेण्याची गरज आहे. कारण काँग्रेसचे कर्नाटकमध्ये सरकार असल्याने त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे. भाजप सरकारकडून नाही. उलट रिव्होल्युशनरी गोवन्सने म्हादईसाठी छेडलेला लढा हाणून पाडण्याचे काम भाजपने केल्याचा आरोप त्यांनी केला.
यावेळी उपस्थित असलेले सांतआंद्रेचे आमदार विरेश बोरकर म्हणाले, की कर्नाटक येथील विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून गोव्यातील काँग्रेसचे नेते म्हादई वाचवण्याची भाषा करीत होते. आता त्यांच्याकडून कोणतीच प्रतिक्रिया का येत नाही? आता काँग्रेस पक्षाच्या राजकारण्यांनी पक्षप्रमुख राहुल गांधी यांच्याकडे म्हादई वाचविण्यासंदर्भात आग्रह धरावा.