वाहिनी गंजल्याने पडली छिद्रे; १ किमी परिसरात पसरले तेल, दुरुस्तीसाठी हालचाली सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 03:46 PM2023-12-13T15:46:04+5:302023-12-13T15:46:11+5:30
१५ दिवसांनी सापडली पेट्रोल गळती
लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को : माटवे-दाबोळी येथील विहिरीच्या पाण्यात पेट्रोलियम पदार्थ कोठून मिसळला याचे सत्य १५ दिवसांनंतर काल, मंगळवारी उघड झाले. मुरगाव बंदरातून साकवाळ येथील झुआरी कंपनी व्यवस्थापनाकडे पेट्रोलियम पदार्थ वाहून नेणारी भूमिगत वाहिनी गंजून तिला गळती लागल्याची माहिती मुरगावचे उपजिल्हाधिकारी भगवंत करमळी यांनी दिली.
२७ नोव्हेंबर रोजी माटवे-दाबोळी येथील एका विहिरीत पेट्रोलियम पदार्थ मिसळून पाणी दूषित झाले होते. नंतर काही दिवसांनी तेथील नाल्यात आणि लोकांच्या शेतजमिनीतूनही पेट्रोलियम पदार्थासारखा वास येऊ लागला. या प्रकारामुळे माटवे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच दूषित पाण्यामुळे येथील शेती, झाडे, माड याला मोठा धोका निर्माण झाला होता.
मुरगाव बंदरात जहाजाद्वारे येणाऱ्या पेट्रोल, डिझेल या पदार्थांचा साठा करून ठेवला जातो. मुरगाव बंदरातून साकवाळ झुआरी व्यवस्थापनाकडे हा साठा नेण्यासाठी १४ किलोमीटर भूमिगत वाहिनी घालण्यात आली आहे. या वाहिनीला कुठेतरी गळती लागल्याने पेट्रोलियम पदार्थ विहिरीच्या पाण्यात, नाल्यात, शेतजमिनीत मिसळल्याचा दाट संशय होता. त्यामुळे झुआरी कंपनीने गळती शोधण्यासाठी खोदकामास सुरुवात केली.
सुरुवातीला काही दिवस गळतीचा शोध न लागल्यामुळे झुआरी व्यवस्थापनाने दुसऱ्या राज्यातून तज्ज्ञ बोलावले तसेच पंजाबहून विशेष श्वान पथक पाचारण केले. या पथकाने गळतीची काही ठिकाणी दाखविल्यानंतर पुन्हा खोदकाम सुरू करण्यात आले. अखेर मंगळवारी दुपारी ३च्या सुमारास गळतीची जागा सापडली.
९०० मीटर भाग बाधित
दाबोळी-वालीस जंक्शनजवळून पेट्रोलियम पदार्थ वाहून नेण्याऱ्या भूमिगत वाहिनीचा काही भाग गंजून त्याला छिद्रे पडल्याचे निदर्शनास आले. खोदकाम सुरू असतानाच कामगारांना त्या जागेवर पेट्रोलियम पदार्थाचा उग्र वास येऊ लागला. याबाबत उपजिल्हाधिकारी भगवंत करमळी यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की, वाहिनीला कुठे गळती लागली, ती जागा सापडली आहे. जिथे वाहिनीला छिद्र पडले तिथून साधारणतः ९०० मीटर अंतरावर उतरणी भागात ती विहीर (माटवे) दूषित झालेली विहीर आहे.
तपासणीत 3 वाहिनीच्या एका ठिकाणी गंजून छिद्र पडल्याचे आढळून आले आहे. ही वाहिनी २२ वर्षीय जुनी असून, तिची पूर्ण तपासणी होणार आहे. वेळोवेळी वाहिनीची देखभाल, दुरुस्ती केली जाते. याच महिन्यात या कामासाठी जर्मनीच्या एका कंपनीला बोलविण्यात आले होते. २२ नोव्हेंबरपूर्वी या वाहिनीतून शेवटचा पेट्रोलियम पदार्थ वाहून नेण्यात आला होता. विहिरीचे पाणी दूषित झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यापासून
ही वाहिनी बंद आहे.
उद्या मलेशियाहून तज्ज्ञांचे पथक येणार
१५ दिवसांपासून वाहिनीला कुठे गळती लागली आहे, ते शोधून काढण्याचे काम युद्धपातळीवर चालू होते, अशी माहिती 'झुआरी'चे अधिकारी शिवप्रसाद नायक यांनी दिली. आता गुरुवारी मलेशियाहून कंपनीचे तज्ज्ञ अधिकारी व कर्मचारी आधुनिक यंत्रणासह गोव्यात येणार असून, त्यानंतर दुरुस्ती काम हाती घेतले जाईल. तसेच संपूर्ण वाहिनीचे सर्वेक्षण करून आणखी कुठे गळती लागली आहे का? याची तपासणी केली जाणार आहे.
संबंधित पेट्रोलियम कंपनीला सरकारने नोटीस बजावलेली आहे. पेट्रोलवाहिनीची वेळोवेळी देखभाल, दुरुस्ती न केल्यानेच हा प्रकार घडलेला आहे. सर्वेक्षण करून सर्वच पेट्रोल वाहिनी बदलण्याचे आदेश सरकारने कंपनीला दिलेले आहेत. - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.