गौमंतकीयांचा गौरव : सतीश शेणई यांना नौसेनेत रिअर ॲडमिरल म्हणून पदोन्नती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 04:12 PM2024-01-21T16:12:29+5:302024-01-21T16:12:56+5:30

सतीश शेणई हे एक जुलै १९९३ रोजी भारतीय नौदलात दाखल झाले.

Honor of Gaumantakiyas: Satish Shenai promoted as rear admiral in Navy | गौमंतकीयांचा गौरव : सतीश शेणई यांना नौसेनेत रिअर ॲडमिरल म्हणून पदोन्नती

गौमंतकीयांचा गौरव : सतीश शेणई यांना नौसेनेत रिअर ॲडमिरल म्हणून पदोन्नती

पेडणे : येथील सतीश शेणई यांची भारतीय नौसेनामध्ये रिअर ॲडमिरल म्हणून पदोन्नती मिळाली आहे. त्यांनी नुकताच, १६ जानेवारी रोजी मुख्यालय, दक्षिणी नौदल कमांड, कोची येथे मुख्य कर्मचारी अधिकारी (प्रशिक्षण) पदाचा कार्यभार स्वीकारला. तालुक्यातील मोरजी येथे जन्मलेले रिअर ॲडमिरल शेणई हे भारतीय नौदल अकादमीचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांच्या या पदोन्नतीने गौमंतकीयांचा गौरव झाल्याची भावना आहे. 

सतीश शेणई हे एक जुलै १९९३ रोजी भारतीय नौदलात दाखल झाले. त्यांचे शालेय शिक्षण पेडणेतील व्हायकाऊंट हायस्कूल तर कॉलेजचे शिक्षण म्हापशातील सेंट झेव्हियर कॉलेजमध्ये झाले. त्यांनी वेलिंग्टन येथून डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज पदवी प्राप्त केली आणि महू येथील आर्मी वॉर कॉलेजमधून आर्मी हायर कमांड कोर्सचे शिक्षण घेतले. उच्चविद्याविभूषित शेणई यांनी मद्रास विद्यापीठातून एमएससी ही पदव्यूत्तर पदवी संपादन केली तर पंजाब विद्यापीठातून एमफिलची पदवी मिळवली.  

शेणई यांचा जन्म पेडणे महालातील मोरजी येथे झाला. त्यांचे वडील मेघनाथ हे प्राथमिक शिक्षक होते. लोक त्यांना ‘भाई मास्तर’ म्हणून ओळखायचे. वडिलांच्या वरचेवर बदली होणाऱ्या नोकरीमुळे गोव्यातील विविध भागात सतीश यांचे वास्तव्य राहिले. फ्लॅग ऑफिसर सतीश हे १९८५ मध्ये खलाशी म्हणून नौदलात सामील झाले. नंतर अधिकारी पदाच्या निवडीसाठी तीन टप्प्यातील सीडब्ल्यू परीक्षेस ते पात्र ठरले. त्यांच्या नौदलात जहाजावर तसेच किनारी भागात अनेक नियुक्त्या झाल्या आहेत. तोफखाना आणि क्षेपणास्त्र युद्धातील तज्ज्ञ म्हणून त्यांनी मुंबई आणि दिल्ली येथे तसेच रणविजय जहाजावर काम केले आहे. नंतर त्यांनी किर्च, त्रिशूल आणि तलवार जहाजे, द्रोणाचार्य आणि भारताच्या किनारी युनिट्सचे कमांडर म्हणून आपले कर्तव्य निभावले. त्यांच्या कार्यकाळात वेस्टर्न नेव्हल कमांड आणि २२ मिसाईल किलर्स स्क्वॉड्रन आदी ठिकाणच्या नियुक्त्यांचा समावेश आहे. कोची येथील नैतिकता, नेतृत्व आणि वर्तणूक अभ्यास (सीईएलएबीएस) केंद्राचे संचालक देखील होते. 

२००९ मध्ये व्हीसीएनएस प्रशंसा पदक, २०११ मध्ये सीएनएस प्रशंसा पदक आणि २०२१ मध्ये नौसेना पदक त्यांना मिळाले आहे. ते हौशी अनवाणी अर्धमॅरेथॉन धावपटू आहेत. ते उत्कृष्ट क्रिकेट खेळाडू असून गायनातही त्यांनी नैपुण्य मिळवलेले आहे. कुटुंबात वडील, पत्नी आणि दोन मुले असा त्यांचा परिवार आहे.

Web Title: Honor of Gaumantakiyas: Satish Shenai promoted as rear admiral in Navy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा