हॉस्पिसियोच्या छपराचा पंखा तुटून महिला जखमी; सार्वजनिक बांधकाम खात्याला कळवूनही खाते सुस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 06:43 PM2020-01-02T18:43:18+5:302020-01-02T18:44:04+5:30
मोडकळीस आलेल्या हॉस्पिसियोच्या महिला वॉर्डातील छपराचा पंखा तुटून खाली पडल्याने एक रुग्ण महिला जखमी झाली.
मडगाव: मोडकळीस आलेल्या हॉस्पिसियोच्या महिला वॉर्डातील छपराचा पंखा तुटून खाली पडल्याने एक रुग्ण महिला जखमी झाली. यानंतर युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हॉस्पिसियोच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. आयरा आल्मेदा यांना घेराव घातला असता या वॉर्डाच्या दुरुस्तीबद्दल सार्वजनिक बांधकाम खात्याला मागच्या ऑक्टोबर महिन्यातच कळविले होते. मात्र त्या खात्याच्या अभियंत्यांनी पुढे काहीच केले नसल्याचे उघड झाले.
गुरुवारी सकाळी ही दुर्घटना घडली. तीव्र मधुमेहाच्या रुग्ण असलेल्या बोर्डा मडगाव येथील रामरती नास्नोडकर या महिलेला हॉस्पिसियोत दाखल करण्यात आले होते. ती खाटीवर झोपली असताना वरचा पंखा तुटून तिच्या पायावर पडला. या रुग्ण महिलेच्या खाटेखाली जमिनीवर आणखी एका वृद्ध रुग्ण महिलेला झोपवले होते. हा पंखा तिच्या बाजूला पडला त्यामुळे ती बचावली. या वॉर्डातील छप्पराचा पंखा तुटून पडण्याची ही दुसरी घटना असून या वॉर्डची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज व्यक्त केली असतानाही सार्वजनिक बांधकाम खात्याकडून याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले.
हॉस्पिसियोची ही इमारत दीडशे वर्षापेक्षा जुनी असून ती पूर्णत: मोडकळीस आली आहे. यापूर्वी एका वॉर्डचा सज्जा तुटूनही एक रुग्ण जखमी झाला होता. अशातच या इस्पितळात रुग्णांना झोपण्यासाठी खाटांची कमतरता असल्याने रुग्णांना जमिनीवरच झोपविले जाते. मडगावात नवीन इस्पितळ बांधून तयार झाले असले तरी काही किरकोळ दुरुस्त्या करण्याचे काम बाकी असल्याने ही इमारत अजून चालू झालेली नाही. दरम्यान बोर्डातील सामाजिक कार्यकर्ते कामिल बर्ाेटो यांनी या घटनेबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करताना 15 जानेवारीपर्यंत जर नवीन इस्पितळ सुरू झाले नाही किंवा त्याबद्दल आम्हाला ठाम आश्वासन मिळाले नाही तर रास्ता रोको करण्याचा इशारा दिला. यासंदर्भात बर्ाेटो यांनी नंतर फातोर्डा पोलीस स्थानकात तक्रारही दाखल केली असून हॉस्पिसियोच्या अधिका-यांवर हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून गुन्हा नोंद करावा, अशी मागणी केली आहे.
सायंकाळी युवा काँग्रेसचे अध्यक्ष वरद म्हादरेळकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वैद्यकीय अधीक्षकांना घेराव घातला. या इस्पितळात असलेल्या कर्मचा-यांकडून रुग्णांना अगदी हीन वागणूक दिली जाते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. जर अशा तक्रारी असल्यास त्या आपल्याला सांगा त्या कर्मचा-यांवर कारवाई करू, असे यावेळी डॉ. आल्मेदा यांनी सांगितले.