गोव्यात अट्टल गुन्हेगार कैदी पळतात कसे?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 04:48 PM2018-12-11T16:48:43+5:302018-12-11T16:48:47+5:30
पोलिसांच्या हातावर तुरी देऊन कैदी पळण्याच्या घटना अजूनही घडत आहेत. सर्वात महत्त्वाची म्हणजे अत्यंत धोकादायक व ‘मोस्ट वॉन्टेड’ कैदीही पळून जात आहेत ही गंभीर बाब आहे.
पणजी - पोलिसांच्या हातावर तुरी देऊन कैदी पळण्याच्या घटना अजूनही घडत आहेत. सर्वात महत्त्वाची म्हणजे अत्यंत धोकादायक व ‘मोस्ट वॉन्टेड’ कैदीही पळून जात आहेत ही गंभीर बाब आहे. मध्य प्रदेशमध्ये मोस्ट वॉन्टेड असलेला आणि गोव्यात युवतीवर गँगरेप केल्यामुळे पकडलेला क्रूरकर्मा ईश्वर मख्वाना हा पोलिसांच्या हातून निसटल्यामुळे धोकादायक गुन्हेगारांच्या बाबतीत पोलीस किती गंभीर आहेत याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
कैदी हे पळून जाण्याची संधीची वाट पाहत असतात आणि त्यातही उपचारासाठी घेऊन जाताना किंवा इस्पितळातून येताना ही संधी ते साधण्याची शक्यता ठाऊक असतानाही एस्कॉर्ट पोलिसांकडून खबरदारी का घेतली जात नाही. त्यात ईश्वर मख्वानासारख्या अत्यंत जहाल गुन्हेगाराला घेऊन जातानाही काहीच खबरदारी कशी घेतली जात नाही ही आश्चर्याची गोष्ट आहे. ज्या माणसाने अनेक युवक युवतींना दरीत ढकलून दिले आहे आणि ब्लेड वापरून हल्ला करण्यास जो पटाईत आहे आणि भोपाळ पोलिसांना जो मोस्ट वॉन्टेड आहे त्या गुन्हेगाराला तुरुंगातून बाहेर काढल्यापासून त्याला उपचारानंतर पुन्हा जेलमध्ये पोहोचवण्यापर्यंत कडक सतर्कता व खबरदारी घेणे आवश्यक होते त्याच्या बाबतीतही पोलिसांनी नेहमीच्या आरोपीसारखीच भूमिका ठेवली. वास्तविक त्याला नेण्यासाठी किमान ५ तरी कॉन्स्टेबल बरोबर हवे होते.
अट्टल गुन्हेगार पळून जाण्याचा हा पहिला प्रकार नाही. अनेक घरफोड्या व दरोडे टाकणारा मायकल फर्नांडीसही अनेकवेळा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला होता. तसेच तो तुरुंगातूनही पळाला होता. आता आग्वाद व सडा तुरुंगातील कैदी प्रशस्त व सुरक्षित अशा कोलवाळ तुरुंगात नेले असल्यामुळे तुरूंगातून पळून जाण्याचे प्रकार घडत नाहीत. त्यामुळे तुरुंगाबाहेर पडल्यावर पळण्याची एकही संधी ते सोडणारे नसतात.
याविषयी माजी तुरुंग महासंचालक एल्वीस गोम्स यांच्याशी संवाद साधला असता गुन्हेगारांना तुरुंगाच्या बाहेर पाठविण्याच्या बाबतीत तुरुंग प्रशासनाचा आणि त्यांची ने आण करण्याच्या बाबतीत एस्कॉर्ट विभागाची बेपर्वाई ही काही नवी नाही. गुन्हेगार व आरोपी कसलीही निमित्ते करून तुरुंगाबाहेर जाण्याच्या संधीत असतात आणि फारशी चौकशी न करताच त्यांना पाठविलेही जाते. निदान त्यांची ने आण करण्याची जबाबदारी घेणा-यांनी तरी जबाबदार रहायला हवे होते, परंतु तेही गंभीर नसतात असे त्यांनी सांगितले.
तुरुंग प्रशासन शिकवा
तुरुंग प्रशासन म्हणजे काय आहे हे गोव्यात कुणाला ठाऊकच नाही. त्यामुळे इतर राज्यातून कुणी तरी प्रशिक्षित असा माणूस प्रशासक म्हणून काही काळासाठी गोव्यात नेमावा आणि गोव्यातील तुरुंगाची घडी व्यवस्थीत बसवून नंतर त्याला जावू द्यावे असा एक प्रस्ताव मी तुरुंग महानिरीक्षक असताना सरकारला पाठविला होता. परंतु त्याकडे फारसे लक्ष दिले गेले नाही असे एल्वीस गोम्स यांनी सांगितले.
त्यांचे मानवाधिकार
पूर्वीसारखे कैद्यांना बेड्या ठोकून नेण्याची परवानगी आज नाही. मानवाधिकार आयोगाने तसे करण्यास सक्त मनाई केली आहे, परंतु या आयोगाच्या आदेशालाही अपवाद ठेवणे गरजेचे बनले आहे. दुस-यांचे जगण्याचे मानवधिकार हिसकावून घेणाºयांना तरी बेड्या ठोकण्याची परवानगी मिळावी असे एसकॉर्ट विभागाच्याच एका अधिका-याने लोकमतशी बोलताना सांगितले.