तू असे कशी करू शकतेस? सूचनाला सोशल मिडियावरून शिव्यांच्या लाखोल्या
By वासुदेव.पागी | Published: January 10, 2024 04:37 PM2024-01-10T16:37:07+5:302024-01-10T16:38:15+5:30
एआय कंपनीच्या सीईओ सूचना सेठ ही सोशल मिडियावरून मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे.
वासुदेव पागी,पणजीः ४ वर्षे वयाच्या पोटच्या पोराचा गळा आवळून खून करणाऱ्या एआय कंपनीच्या सीईओ सूचना सेठ ही सोशल मिडियावरून मोठ्या प्रमाणात ट्रोल होत असून लोक शिव्यांच्या लाखोली वाहून आपला संताप व हळहळ व्यक्त करताना दिसत आहेत.
आपला पती व्यंकट रमण हिच्याशी संबंध बिघडून घटस्फोटापर्यंत मामला पोहोचल्यावर विभक्त पतीवरील राग कोवळ्या ४ वर्षाच्या मुलावर काढताना त्याचा या बाईने गळाच घोटला. गोव्यातील कांदोळी येथील हॉटेलमधील एका खोलीत त्याला ठार मारून त्याचा मृतदेह बॅगमध्ये घालून गोव्याहून बंगळूरला पळ काढत असताना चित्रदुर्ग जिल्ह्यात तिला पोलिसांनी पकडले होते. ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर कोण ही सूचना हे पाहण्यासाठी लाखो लोकांनी गुगल सर्च इंजिनवरून तिची माहिती घेण्याचे प्रयत्न केले. तसेच तिच्या सोशल मिडिया प्रोफायलवरूनही तिला ट्रोल करणे सुरू केले आहे. एक्सवरून तर शिव्यांच्या लाखोल्याच वाहिल्या जात आहेत. अत्यंत जहाल शिव्यांबरोबरच बॅड लेडी, तू हे का केलेस, माता आहेस की वैरीण?, शेम ऑन यू, तू असे कसे करू शकतेस, खुनी, असे काही प्रमाणात सौम्य अपशब्दही वापरण्यात आले आहेत.
पतीपत्नीचा घटस्फोटासाठी खटला चालू होता आणि न्यायालयाने आदेशही सुनावला होता. त्यानुसार मुलाची कस्टडी आईकडे देण्यात आली होती, परंतु आठवड्यातून एक दिवस विभक्त पती व्यंकटेश मुलाला भेटू शकत होता. भेटण्याचा दिवस रविवार ठरला होता. मुलाला आईपेक्षा बाबाची ओढ अधिक होती आणि वडिलांना तडफडविण्यासाठीस तिने मुलाचा काटा काढला होता असा निष्कर्श आतापर्यंतच्या तपास कामातून आला आहे.