स्पर्शही न करता स्लॅब कसा पडला? कोसळलेले छप्पर जुनेच 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 04:36 PM2023-07-18T16:36:16+5:302023-07-18T16:37:06+5:30

निकृष्ट कामाबद्दल विरोधकांचे टीकास्त्र

how did the slab fall without even touching it goa kala academy collapsed roof old | स्पर्शही न करता स्लॅब कसा पडला? कोसळलेले छप्पर जुनेच 

स्पर्शही न करता स्लॅब कसा पडला? कोसळलेले छप्पर जुनेच 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: नूतनीकरण सुरू असलेल्या कला अकादमीमध्ये रविवारी खुल्या 5 रंगमंचाकडील (ओपन एअर थिएटर) जो भाग कोसळला, त्या ठिकाणी नव्याने कोणतेही काम करण्यात आले नव्हते. अकादमीच्या अंतर्गत भागात मात्र काम जोरात सुरू होते.

यादरम्यान, ड्रिलिंगचा जास्त वापर केल्याने या छताला तडे गेले असावेत आणि जोरदार पाऊस सुरू असल्याने या सर्वांचा एकत्रित परिणाम होऊन हे छत कोसळले, असा अंदाज कामगारांनी बांधला आहे. याबाबत आता तज्ज्ञांकडून अहवाल सादर होणार आहे. त्यातून नेमकी स्थिती समोर येईल.

घोटाळा आधीच उघड केला होता

कला अकादमीच्या खुल्या रंगमंचाचा स्लॅब कोसळल्याप्रकरणी दोषींवर जबाबदारी निश्चित करुन त्वरित कारवाई करावी. अन्यथा मंगळवारी सुरु होणाया विधानसभा अधिवेशनात सरकारला या विषयावरून धारेवर धरले जाईल, असा इशारा फातोड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी पत्रकार परिषदेत दिला. कला अकादमीसंदर्भात न्यायालयात जी याचिका आहे, त्याची सुनावणी लवकर व्हावी यासाठी प्रपत्न करणार आहे, त्यांनी सांगितले. आमदार सरदेसाई म्हणाले, कला अकादमीच्या नूतनीकरणाची जबाबदारी सार्वनजिक बांधकाम खात्याची (पीडब्ल्यूडी) असल्याचे कला व संस्कृती मंत्री गोविद गावडे म्हणतात. मात्र, पीडब्ल्यूडी निविदा जारी न करता कधीच कुठल्या कामाचे कंत्राट देत नाही. 

नियमांमध्ये ते बसतच नाही. त्यामुळे निविदा एका विशिष्ट कंत्राटदाराला देताना, यात निश्चितच हस्तक्षेप झाल्याचे स्पष्ट होते, असा आरोप त्यांनी केला. आमदार सरदेसाई म्हणाले, 'अकादमीचे नूतनीकरण हा मोठा घोटाळा आहे. मी मागील विधानसभा अधिवेशनात घोटाळा उघडसुद्धा केला होता. नूतनीकरणावर १०० कोटी रुपये खर्च केले जात आहे. एका बाजूने सरकारच्या तिजोरीत खडखडाट असताना इतक्या मोठ्या प्रमाणात हा घोटाळा केला जात आहे. खुल्या रंगमंचाचा स्लॅब कोळसल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तेथे जावून पाहणी केली. मात्र, पाहणी पुरेशी नसून यास जे जबाबदार आहेत, त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करा. अन्यथा सरकारला धारेवर धरु, असा इशारा आमदार सरदेसाई यांनी यावेळी दिला.

दोन मंत्र्यांचे राजीनामे घ्या राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा गोवा प्रभारी क्लाइड फास्टो यांनी सरकारने ताबडतोब एसआयटी स्थापन करून घटनेची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. ते म्हणाले की, नूतनीकरणाचे काम कोणतीही निविदा न काढता देण्यात आले. कला संस्कृती मंत्र्यांवर याबाबतीत आरोप होत असतानाही मुख्यमंत्री गप्प राहिले. आता छत कोसळल्याने भ्रष्टाचार उघड झाला आहे. या प्रकरणात एसआयटी स्थापन करून निःपक्षपाती चौकशी करावी. या दोघांचाही मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा.

'आप'कडून टीकेची झोड

आम आदमी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष अॅड. अमित पालेकर यांनी सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, हे सरकार भ्रष्टाचार लपविण्यात माहीर बनले आहे; परंतु त्यातून केलेले कर्म लपणार नाही. याची प्रचीती म्हणजे ही स्लॅब कोसळण्याची घटना आहे. कला अकादमी संकुल खुले होऊन त्यानंतर अशा दुर्घटनेत एखाद्याचा जीव गेला असता तर कोण जबाबदार असते? सरकारमधील मंत्री. आमदारच भ्रष्ट असल्यामुळे प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीही त्यांच्याच मार्गाने जात आहेत. भ्रष्टाचार उघड आहे. मग आणखी बांधकाम खात्याचे अधिकारी काय अहवाल देणार?' असा सवाल त्यांनी केला.

'ओव्हर स्मार्ट मंत्री जबाबदार : काँग्रेस

खुले सभागृह कोसळण्यास ओव्हर स्मार्ट' मंत्र्यांचा दृष्टिकोन जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसने पत्रकार परिषदेत केला. संबंधित अधिकारी व मंत्र्यांवर निष्काळजीपणा केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. सरकारने चार्ल्स कुरैया फाउंडेशनच्या सूचना फेटाळून लावल्याने अकादमीचा विध्वंस दिसत आहे. याप्रकरणी कडक कारवाई हवी अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तुलिओ डिसोझा, सरचिटणीस अॅड. श्रीनिवास खलप व्हेरिएटो फनांडिस आदींनी यावेळी केली.

शिवसेनेचे टीकास्त्र 

शिवसेना (उद्धव गट) गोवा राज्यप्रमुख जितेश कामत यांनी शहाजहान मॉडेलच्या ५० कोटी रुपयांच्या ताजमहालाचा बुरुज कोसळला, अशी टीका केली आहे.

कुरैवा फाउंडेशनचे आक्षेप; पण

यापूर्वी कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या कामाबद्दल चार्ल्स कुरैया फाउंडेशनने आक्षेप घेतला होता. या कामाने मूळ वास्तू बिघडेल. त्यामध्ये बदल केला जाईल, असा आरोप करण्यात आला होता. त्यावेळी कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी अकादमीची पाहणी करत फक्त मुख्य ऑडिटोरियम, कृष्ण कक्ष व इतर लहान-मोठ्या गोष्टीचे नूतनीकरण करण्यात येईल. मूळ वास्तू जशी आहे तशीच ठेवण्यात येईल, असे सांगितले होते.

नाट्य परंपरा हरवतेय

कला अकादमीतील घटनेला कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे जबाबदार आहेत. आम्ही याअगोदर त्यांना अनेक वेळा अकादमीच्या बांधकामाविषयी सांगितले होते; पण आपल्याला सर्वच माहीत आहे असे सांगत होते. गोव्याची नाट्य परंपरा, तियात्रसारखी कला यातून हरवत चालली आहे. -राजदीप नाईक, नाट्य कलाकार

श्वेतपत्रिका काढणार

चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणात श्वेतपत्रिका काढेन, असे सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी सांगितले. काब्राल यांनी दुपारी घटनास्थळाला भेट दिली. ते म्हणाले की, चौकशी अहवाल मिळाल्याशिवाय मी काही बोलू शकत नाही. कला अकादमीचा नूतनीकरण झालेला भाग कधी खुला केला जाईल, हेही मी आताच काही सांगू शकत नाही. काम पूर्ण झाल्यानंतर बांधकाम खाते ते कला संस्कृती खात्याच्या स्वाधीन करील आणि त्यानंतरच निर्णय होईल. कला अकादमी कधी सुरु होईल, याबद्दल मी आताच तारीख देऊ शकत नाही.
-नीलेश काब्राल, बांधकाम मंत्री

कोट्यवधी रुपये खर्च करून अकादमीचे काम सुरु आहे; परंतु सध्या अकादमीचे काम पाहता आणि छत कोसळल्याने कोटयवधी रुपयांचा चुराडाच झाला आहे. सरकार असंवेदनशील बनले आहे. ताजमहाल कला अकादमीच्या तुलनेत अजूनही चांगलाच आहे परंतु अकादमीची दुर्दशाच आली आहे. फसविण्याचे हे कारस्थान आहे. - महेश म्हांबरे, काँग्रेस
 

Web Title: how did the slab fall without even touching it goa kala academy collapsed roof old

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा