राज्यात पर्यटकांचा छळ कसा रोखाल?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 09:50 AM2023-03-21T09:50:48+5:302023-03-21T09:51:41+5:30
स्थानिकांमध्ये रुजलेला रोष, पर्यटकांना लुटणाऱ्या व्यावसायिकांचा वाढता लोभ आणि वाट्टेल ते करायला मिळेल म्हणूनच गोव्यात येणारे बेमुर्वत पर्यटक!
सदगुरू पाटील, निवासी संपादक, लोकमत, गोवा
डिसेंबर १९६१ मध्ये पोर्तुगीज राजवटीतून गोवा मुक्त झाला तेव्हा लोकसंख्या होती साडेसहा लाख. आता त्याच प्रदेशात सोळा लाख लोक राहतात. भौगोलिक आकार तेवढाच. ३,७०२ चौरस किलोमीटर परप्रांतीय मजूर, स्थलांतरितांची संख्या तीन लाख वर्षाकाठी किमान ८० लाख पर्यटक गोव्यात येतात. दोन आधुनिक विमानतळ. दोनच जिल्हे. एवढे हे चिमुकले राज्य. रुपेरी वाळूचे स्वच्छ सागरकिनारे, सोळाव्या शतकातील पांढऱ्या शुभ्र चर्चेस, युरोपीयन वास्तुशास्त्राची छाप असलेली देखणी घरे आणि सुंदर मंदिरांच्या गोव्यात अलीकडे पर्यटकांवर प्राणघातक हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत.
हॉटेलांमधून पर्यटकांचे सामान चोरीस जाणे, टॅक्सी व्यावसायिकांकडून होणारी लूट, पोलिसांची सतावणूक, इजच्या अति सेवनानं पर्यटकांचे होणारे मृत्यू, पर्यटक समुद्रात बुडून मरण्याच्या घटना, स्थानिक विरुद्ध पर्यटक संघर्ष यामुळे पूर्ण पर्यटन व्यवसायच बदनाम होऊ लागला आहे. देश- विदेशातील पर्यटक हल्ली गोव्यातील कटू अनुभव सोशल मीडियावर शेअर करू लागले आहेत.
उत्तर गोव्याच्या किनारी भागातील हणजूण येथे दिल्लीतील पर्यटकांवर तलवारी व सुऱ्याने हल्ला झाल्याच्या ताज्या घटनेने गोव्यातील पर्यटन क्षेत्र हादरले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीदेखील सध्याच्या स्थितीविषयी चिंता व्यक्त केली.
गोमंतकीयांमध्ये सध्या पर्यटकांविषयी रोष वाढतो आहे, त्याचबरोबर पर्यटकही गोव्याला दोष देऊ लागले आहेत. किनारी भागातील पोलिस निरीक्षक दत्तगुरू सावंत यामागची अनेक कारणे सांगतात. अनेक देशी पर्यटक गोव्यात आल्यानंतर तरुण मुली शोधतात. याचा गैरफायदा काही क्लब व रेस्टॉरंटवाले घेतात. पाच हजार रुपयांची दारू पिल्यास तरुण मुलगी मोफत अशी विचित्र लालूच काही बार व रेस्टॉरंट व्यावसायिक पर्यटकांना दाखवतात. मोहात पडून पर्यटक पित राहतात. शेवटी पाच हजार रुपयांचे मद्याचे बिल होते, पण मुलगी काही मिळत नाही. असल्या कारणावरुन हल्ली पर्यटक व रेस्टॉरंट मालकांमधील वाद वाढले आहेत. आपलीच लाज जाईल या भीतीपोटी पर्यटक पोलिसांकडे तक्रार करायला येत नाहीत. अनेकदा खाद्यपदार्थ आणि मद्याचे बिल व्यावसायिक वाढवून देतात. मग प्रचंड भांडणे ! कळंगुट, हणजूणा व अन्य भागातील पोलिसांना हस्तक्षेप करुन ही भांडणे मिटवावे लागतात. अॅप आधारित टॅक्सी सेवा गोव्यात येऊ पाहाते, तर तिला विरोध होतो. त्यामुळे टॅक्सीचालक मनमानी करून आपल्याला लुटतात अशी जगभरातील पर्यटकांची भावना आहे. हे पर्यटक आपण गोव्यात कसे लुटलो गेलो हे सोशल मीडियावर जाहीर करतात. गोव्यातील पर्यटनाला यामुळे अलिकडे बदनामीचा डाग लागू लागला आहे. हे रोखण्यासाठी गोव्याचे पर्यटनखातेही धडपडत आहे.
मोरजी, आश्वे, कळंगुट, बागा अशा भागांमध्ये पर्यटकांचे सामान लुटण्याचे प्रकार अलीकडे झालेले आहेत. पोलिस निरीक्षक दत्तगुरू सावंत सांगतात, श्रीमंत पर्यटकांकडे लाख लाख रुपये किमतीचे मोबाइल असतात. काही बेरोजगार युवक मोबाइल लंपास करतात. विशेषतः ३१ डिसेंबरला लाखो पर्यटक गोव्याच्या किनाऱ्यांवर नववर्ष साजरे करत असताना एका रात्रीत हजारभर तरी मोबाइल चोरीला जातात.
खरेतर गोयंकार तसा स्वभावाने प्रेमळ त्याच्यावर 'अतिथी देवो भव' हा संस्कार असतो, पण मजा करायलाच येणारे पर्यटक अनेकदा मद्यपान करून स्थानिकांशी हुज्जत घालतात, त्यामुळेही वाद होतो. मद्यपान करून पर्यटक समुद्रात उतरतात आणि स्वत:च्या अति उत्साहाचे बळी ठरतात. अंमली पदार्थांचे अतिसेवन अनेक पर्यटकांचा जीव घेते. बदनाम होतो तो गोवा !
काही महिन्यांपूर्वी टिकटॉक स्टार सोनाली फोगाट हिचा मृत्यू एका क्लबमध्ये ड्रगचे अतिसेवन केल्याने झाला. तेव्हापासून गोव्याचे पर्यटन बदनामीच्या घेन्यात सापडले आहे. गोव्याचे नाईट लाईफ खूप आकर्षक असते, पण गोव्याचे पर्यटन सुरक्षित राहिलेले नाही असे पर्यटकांना वाटू लागले आहे. बाहेरून येणाऱ्यांच्या उद्घट वर्तनाने स्थानिकांमध्ये वाढत चाललेला रोष, पर्यटकांची लूट करून स्वतःचे खिसे भरणाऱ्या व्यावसायिकांचा वाढता लोभ आणि गोव्याला फिरायला जाणे म्हणजे वाट्टेल ते करण्याचा परवाना असे मानणाऱ्या बेमुर्वत पर्यटकांना न राहणारे भान असे अनेक घटक गोव्याच्या बदनामीचे कारण ठरत आहेत. या साऱ्या वादळात दुधा मधाच्या या - भूमीमधला हिरवा दिलासा हरवू नये, एवढेच!
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"