इफ्फीत उद्घाटनाच्या सिनेमाला प्रचंड गर्दी; अनेकांचा अपेक्षाभंग, पोलिसांवर ताण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2017 09:06 PM2017-11-20T21:06:54+5:302017-11-20T21:09:48+5:30
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पहिल्या दिवशी बियाँड द क्लाउड्स या उद्घाटनाच्या चित्रपटाला प्रतिनिधींची संख्या प्रमाणापेक्षा वाढल्याने अनेकांची निराशा झाली.
पणजी : आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पहिल्या दिवशी बियाँड द क्लाउड्स या उद्घाटनाच्या चित्रपटाला प्रतिनिधींची संख्या प्रमाणापेक्षा वाढल्याने अनेकांची निराशा झाली. दरवर्षी गर्दी झाल्याने होणारा गोंधळ टाळण्यासाठी स्वत: उत्तर गोवा पोलीस अधीक्षक चंदन चौधरी या फौजफाटा घेऊन उपस्थित होत्या. त्यामुळे प्रतिनिधींनी गोंधळ घातला नाही, पण आपली नाराजी मात्र व्यक्त केली.
आयनॉक्सच्या स्क्रिन 1 या थिएटरची आसनक्षमता जवळपास सहाशे आहे. त्यापेक्षा अधिक प्रतिनिधींना सोडता येत नव्हते. एकाच थिएटरमध्ये हा उद्घाटनचा शो असल्याने सायंकाळी चारपासूनच अनेकजण आवारातच होते. रांग लावण्यास सुरुवात झाल्यानंतर गर्दी वाढू लागली. एकाच प्रवेशद्वारातून प्रेक्षक सोडले जात असल्याने पूर्ण आयनॉक्सच्या पुढील आवारात प्रतिनिधींची मोठी यू आकाराची रांग लागलेली होती.
आसनक्षमतेएवढे प्रतिनिधी सोडल्यानंतर स्वत: चौधरी यांनी आयनॉक्समध्ये जाऊन पाहणी केली. त्यानंतर अधिका-यांना प्रवेशद्वारासमोर पोलिसांचे कडे करण्यास सांगितले. थिएटरमध्ये प्रतिनिधी सोडले जात होते, तोर्पयत रांगेत उभे राहणा-यांचीही संख्या कायम होती. जेव्हा प्रतिनिधी सोडण्यास बंद झाले तेव्हा स्वत: मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र तालक यांनी बाहेर येऊन क्षमता पूर्ण झाल्याचे सांगितले. त्याचवेळी काही प्रतिनिधी त्यांना गराडा घालतात असे दिसताच पोलिसांनी सर्वांना बाजूला केले.
दरम्यान, ज्यांची चित्रपट पाहण्याची संधी हुकली त्यांनी नाराजी व्यक्त केली. अनेक जण आयोजन समितीच्या प्रतिनिधींना इतर थिएटरमध्ये चित्रपट का लावला नाही, अशी विचारणा करीत होते. आयनॉक्सच्या एकावेळी चार थिएटरपैकी किमान दोन-तीन थिएटरमध्ये दाखविता आला असता तर रसिकांची निराशा झाली नसती, असेही काहींचे म्हणणे होते.
सध्या आयनॉक्स आणि मॅकेनिझ पॅलेससह मांडवी किना-याच्या बाजूने केलेल्या विद्युत रोषणामुळे या परिसराला वेगळीच छटा प्राप्त झाली आहे. त्यामुळे या परिसरात सकाळपासून अनेकजण मोबाईलवरून छायाचित्रण आणि सेल्फी काढताना दिसतात. त्यात इफ्फीसाठी आलेल्या प्रतिनिधींचाही समावेश असतोच.
अद्याप कामे सुरूच
इफ्फीनिमित्त मांडवी किना-याच्या झाडांच्या भोवती सुशोभिकरणाचे काम अद्याप सुरूच आहे. काही ठिकाणी लोखंडी ग्रील बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे, तर काही ठिकाणी अद्याप बांधकामाला प्लास्टर करण्याचेच काम सुरू आहे. येत्या दोन दिवसांत हे काम पूर्ण होईल, असे येथील कर्मचा-याने सांगितले.