गोवा माइल्स टॅक्सीला उत्तम प्रतिसाद; लवकरच रिक्षाही सेवेत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 09:57 PM2019-02-08T21:57:40+5:302019-02-08T21:58:24+5:30
पत्रकार परिषदेत ‘गोवा माइल्स’चे व्यवस्थापकीय संचालक उत्कर्ष दाभाडे यांनी ही माहिती दिली.
पणजी : ‘गोवा माइल्स’ या अॅपधारित टॅक्सीसेवेला चांगला प्रतिसाद मिळत असून गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत १ लाख ८५ हजार लोकांनी हे अॅप डाउनलोड केले. सध्या १ हजारहून अधिक टॅक्सी सेवेत असून लवकरच ऑटोरिक्षाही या सेवेत आणल्या जातील. १00 हॉटेल्सनी ‘गोवा माइल्स’कडे हातमिळवणी केलेली आहे. भविष्यात पर्यटकांना गोवा फिरण्यासाठी या अॅपअंतर्गत पॅकेजही दिले जाईल तसेच राज्याच्या अंतर्गत भागातही या सेवेचा विस्तार केला जाईल.
पत्रकार परिषदेत ‘गोवा माइल्स’चे व्यवस्थापकीय संचालक उत्कर्ष दाभाडे यांनी ही माहिती दिली. ही सेवा गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आली आहे. दाभाडे म्हणाले की, ‘ सहा महिन्यांपूर्वी ऑगस्टमध्ये या सेवेची सुरवात केवळ १५0 टॅक्सी घेऊन केली आज १ हजाराहून अधिक टॅक्सी ताफ्यात आहेत. तंत्रज्ञानाचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत प्रभावीपणे कसा पोचविता येतो याचे हे उत्तम उदाहरण आहे. ८५ टक्के ग्राहक कार्डाने पेमेंट करतात. नेट बँकिंगचा वापर करतात. ४५ टक्के ग्राहक या सेवेसाठी पणजी ते विमानतळ किंवा परत अशा लांब पल्ल्याच्या अंतराची निवड करतात. ३५ टक्के ग्राहक पुन: या सेवेचा लाभ घेतात.
दाभाडे पुढे म्हणाले की, ‘राज्यात एकूण २२ हजार टॅक्सी असून सुमारे १८00 कोटी रुपयांची अर्थव्यवस्था या व्यवसायात आहे. मार्च अखेरपर्यंत ८७ हजार टॅक्सीफेºयांचे लक्ष्य आहे. पुढील सहा महिन्यांचा ‘रोड मॅप’ही कंपनीने तयार केला आहे. पुढील १५ दिवसात आगाऊ टॅक्सी बुकींगचीही व्यवस्थाकेली जाईल.
गोव्यात येणारे पर्यटक मोठ्या प्रमाणात नाइट लाइफचा आनंद लुटतात. बागा किनारी पट्ट्यात छोट्या अंतराच्या सेवेसाठी जास्त मागणी आहे. ही सेवा महिलांसाठीही सुरक्षित ठरल्याचा दावा करताना ३५ टक्के महिला एकट्या प्रवास करतात, अशी माहिती दाभाडे यांनी दिली.
दरम्यान, गोवा माईल्सच्या टॅक्सीचालकांवरील हल्ल्यांबाबत विचारले असता अशा १३ घटना घडल्या असून पोलिसात गुन्हे नोंद झालेले आहेत. आम्ही अशा प्रकरणात तात्काळ तक्रार करतो. पोलिस तसेच वाहतूक खात्याकडेही तक्रार केली जाते. चालकांनाही अॅप दिलेले आहे. अशा घटना घडल्यास त्यांना लगेच माहिती देण्यास सांगितले आहे, असे दाभाडे यांनी स्पष्ट केले.