वाहतूक उल्लंघने टिपून नागरिकांनी कमाविले लाख रुपये, गोवा पोलिसांच्या ‘नागरिक पोलीस’ मोहिमेला उदंड प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2017 10:57 PM2017-12-23T22:57:12+5:302017-12-23T22:57:17+5:30
वाहतूक नियमांची उल्लंघने रोखण्यासाठी गोवा पोलिसांनी घोषित केलेल्या सेन्टनरी अवार्ड योजनेला म्हणजेच ‘नागरिक पोलीस’ योजनेला ऊत्स्फूर्त प्रतिसाद मिळला.
पणजी - वाहतूक नियमांची उल्लंघने रोखण्यासाठी गोवापोलिसांनी घोषित केलेल्या सेन्टनरी अवार्ड योजनेला म्हणजेच ‘नागरिक पोलीस’ योजनेला ऊत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून पहिल्या टप्प्यात ३४९४ जणांना उल्लंघनांसाठी नोटीसा पाठविल्या आहेत. उल्लंघनाचे फोटो घेऊन पोलिसांना पाठविणा-या २३ जणांना मिळून १ लाख रुपये रोख रक्कम वितरीत करण्यात आली. २८०० गुण घेतलेले डेरिएस फर्नांडीस यांनी २८ हजार रुपये बक्षीस मिळविले.
एखाद्या वाहन चालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे कुणाला आढळून आले तर त्याने त्याचा वाहनासह फोटो क्लिक करून तो ७८७५७५६११०या क्रमांकावर गोवा पोलिसांच्या वाहतूक विभागाला पाठवून द्यावा असे आवाहन पोलिसांकडून १० नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते. पाठविण्यात आलेले छायाचित्र उल्लंघन स्पष्टपणे दाखविणारे असेल आणि त्या वाहनाचा नोंदणी क्रमांक स्पष्ट टीपला गेला असेल तर ते पाठविणा-याला विशिष्ठ गुण दिले जात आहेत. वेगवेगळ्या उल्लंघनाला वेगवेगळे गुण ठरविण्यात आले आहेत.
हेल्मेटविना दुचाकी चालविणे, क्रमांकपट्टी सदोष असणे, नो एन्ट्रीमधून जाणे, चारचाकी चालविणा-याने सीटबेल्ट न वापरणे, नो पार्कींगच्या जागी पार्कींग करणे, गाडी चालविताना हातात मोबाईल घेऊन तो वापरणे, सिग्नलचा अनादर करणे अणि इतर स्वरूपाच्या उल्लंघनांचा त्यात समावेश आहे. ही उल्लंघने पाठविण्यासाठी पूर्वी पोलीस खात्याच्या वाहतूक विभागाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. पहिल्या टप्प्यात एकूण १ हजार हून अधिक सदस्य झाले होते. ते ५ ते ६ हजारापर्यंत वाढविले जातील अशी माहिती देण्यात आली. प्रत्येक १०० गुणांसाठी एक हजार रुपये या प्रमाणे सर्वाधिक २८०० गुण मिळवून २८ हजार रुपयेपर्यंतची रोख रक्कम जिंकण्याची कामगिरी बजावलेल्या डेरिएस फर्नांडीस याच्यासह सर्व २३ जणांना मु्ख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडून गौरविण्यात आले.
ही मोहीम अशीच चालू ठेवण्यात येणार आहे. पुढील टप्पा हा ३ महिन्यांचा असून या काळात सर्वाधिक उल्लंघने टीपणाºयाला मारुती ऑल्टो कार बक्षीस देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी सांगितले. तसेच त्या पुढच्या तीन महिन्याच्या टप्प्यासाठी सर्वाधिक उल्लंघने टिपणा-याला दुचाकी तर त्या नंतरच्या टप्प्यात सर्वाधिक उल्लंघने टिपणा-याला कार बक्षीस दिली जाईल अशी माहिती यावेळी देण्यात आली. पहिल्या टप्प्यात पहिले बक्षीस जिंकणा-याला इतर टप्प्यातील स्पर्धेत भाग घेता येणार नाही अशी अट टाकण्यात आली आहे. २०२९ पर्यंत अपघातांचे प्रमाण ५० टक्क्यांनी घटविण्यासाठी विशेष योजना हाती घेणार असून त्यासाठी बिगर सरकारी संस्थेची मदत घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पेट्रोल भरण्याच्या वादातून काही तरुणांनी पंपावरील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. शिवाय, आपल्या गाड्यांमध्ये सुमारे दीड हजार रुपयांचे पेट्रोल भरून पळ काढल्याचीही माहिती समोर आली आहे. कल्याण पश्चिमेतील बैलबाजार परिसरातील पेट्रोल पंपावरील ही घटना आहे.