उमेदवारीसाठी प्रचंड चुरस! पालिकेसाठी टूगेदर फॉर साखळीसह भाजपची दोन दिवसांत अंतिम यादी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 08:30 AM2023-04-11T08:30:19+5:302023-04-11T08:31:34+5:30
सर्वांनीच विजयी होण्याची क्षमता असलेले उमेदवार रिंगणात उतरवण्याची तयारी ठेवली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क डिचोली: साखळी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सत्तारुढ टूगेदर फॉर साखळी गटासह भाजपने उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू केली आहे. दोघांकडून ही बहुतांश उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली असून, बैठकांचे सलग सत्र सुरू आहे. सर्वांनीच विजयी होण्याची क्षमता असलेले उमेदवार रिंगणात उतरवण्याची तयारी ठेवली आहे.
'टूगेदर फॉर साखळी'चे धर्मेश सांगलानी, प्रवीण ब्लेंगन, राजेश सावळ यांनी उमेदवारांची नावे शॉर्ट लिस्ट केली आहेत. आगामी दोन दिवसांत अंतिम यादी निश्चित करण्यात येईल, असे प्रवीण ब्लेंगन व राजेश सावळ यांनी सांगितले. आम्ही साखळीतील जनतेच्या सेवेसाठी सक्षम उमेदवार देऊ असेही त्यांनी सांगितले.
भाजपकडूनही पालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू असून बैठकांचे सत्र सुरू आहे. आमचे बहुतेक उमेदवार निश्चित झाले आहेत. काही जागांबाबत दोन दिवसांत निर्णय होईल. यावेळेस भाजप पूर्ण क्षमतेने रिंगणात उतरणार असून, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही विशेष लक्ष केंद्रित केले आहे, असे आनंद काणेकर, दयानंद बोर्येकर यांनी सांगितले.
बहुसंख्य उमेदवारांनी चाचपणी करून आपले नशीब अजमावण्याची तयारी केली आहे. अनेक प्रभागात जादा उमेदवार रिंगणात असतील. त्यातून प्रत्येक मताचे वजन वाढणार आहे हे निश्चित.
घरोघरी प्रचार, कोपरा बैठकांच्या माध्यमातून आता प्रत्येक मतासाठी उमेदवारांची धावपळ सुरू होणार आहे. त्यादृष्टीने तयारीला वेग आला असून उमेदवारी अर्ज भरून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांची अंतिम यादी निश्चित होताच प्रचाराला वेग येणार आहे. अनेक विद्यमान नगरसेवक पुन्हा नशीब अजमावण्यासाठी सक्रिय झालेले आहेत. गेल्या पाच वर्षात झालेली कामे, जनतेच्या अपेक्षा, साखळी शहराचा एकूण विकास असे अनेक मुद्दे या निवडणुकीत असतील. राजकीय चढाओढीत प्रभाग रचना, नवे उमेदवार ह्या बाबीही महत्त्वाच्या ठरतील.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"