'म्हादई'साठी मानवी साखळी; सात किलोमीटरपर्यंत शेकडो सहभागी होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 02:50 PM2023-05-09T14:50:14+5:302023-05-09T14:51:35+5:30
या मानवी साखळी १० ते १२ हजार लोक भाग घेतील, अशी अपेक्षा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : गोव्याची जीवनदायीनी म्हादई वाचवण्यासाठी आता म्हादईप्रेमी सात किलोमीटर मानवी साखळी तयार करणार आहेत. पणजीत २० रोजी संध्याकाळी ४ वाजता मिरामार किनारा ते सांतामोनिका जेटी अशी ही साखळी तयार केली जाईल, अशी माहिती 'सेव्ह म्हादई सेव्ह गोवा' चे अॅड. हृदयनाथ शिरोडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या मानवी साखळी १० ते १२ हजार लोक भाग घेतील, अशी अपेक्षा आहे. या आंदोलनात गोमंतकीयांनी मोठ्या संख्येने भाग घ्यावा व म्हादई वाचविण्याचा लढा अधिक तीव्र करावा. म्हादई कर्नाटकाकडे वळविण्याचा डाव हाणून पाडू, असे आवाहन त्यांनी केले. हेरिटेज अॅक्शन ग्रुप व सेव्ह म्हादई सेव्ह गोवा यांचा हा संयुक्त उपक्रम आहे.
पर्यावरणप्रेमी व हेरिटेज अॅक्शन ग्रुपच्या हेता पंडित म्हणाल्या, म्हादई ही केवळ नदी असून पर्यावरणाचा सुध्दा मोठा भाग आहे. त्यामुळे ती अन्य ठिकाणी वळवली जाऊ नये यासाठी गोमंतकीयांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यादृष्टीने ही मानवी साखळी तयार करुन पर्यावरण व म्हादईचे महत्व पटवून दिले जाईल. सुमारे ७ किलोमीटर ही साखळी असेल. यात भाग घेणाऱ्यांनी निळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत. निळा रंग हा पर्यावरण व म्हादई नदी दर्शवते. यावेळी 'म्हादई वाचावी' अशी प्रार्थना केली जाईल, असे त्यांनी सांगितले
परिणाम लक्षात घ्या...
इतिहास तज्ज्ञ प्रजल साखरदांडे म्हणाले, की म्हादई नदीवर अनेक वन्य जीव तसेच जैवविविधता अवलंबून आहे. त्यामुळे ती गोव्यातून वळवली तर केवळ हवामानाचा बदल होणार नाही तर धरणे व नदीचा प्रवाह आटेल. त्यामुळे पाणी समस्या भासेल व गोव्यातील सहा तालुक्यांवर त्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे परिणाम होईल. या मानवी साखळीच्या माध्यमातून म्हादई वाचवा अशी हाक दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.