म्हादईसाठी मानवी साखळी; मिरामार किनारी आयोजन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2023 12:55 PM2023-05-21T12:55:01+5:302023-05-21T12:55:20+5:30
या मानवी साखळीत सहभागी झालेल्या लोकांची संख्या ही अपेक्षेपेक्षा फारच कमी होती.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : 'म्हादई आमची आई, तिला वाचवा'असे आवाहन करीत पणजीतील मिरामार किनाऱ्यावर म्हादईप्रेमींनी मानवी साखळी तयार केली. मात्र, या मानवी साखळीत सहभागी झालेल्या लोकांची संख्या ही अपेक्षेपेक्षा फारच कमी होती.
गोव्याचे पर्यावरण अबाधित राखण्यासाठी तसेच भविष्यात राज्याला पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी म्हादई नदीचे पाणी कर्नाटककडे वळवले जाऊ नये. तसे झाले तर गोव्याला प्रचंड फटका बसणार. म्हादई वाचवा, अशी हाक यावेळी दिली.
या आंदोलनात विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, काँग्रेसचे केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा, हळदोणेचे आमदार अॅड. कार्लस फरेरा, पदाधिकारी अमरनाथ पणजीकर, एल्वीस गोम्स, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा बीना नाईक, गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई, आम आदमी पक्षाचे गोवा अध्यक्ष अॅड. अमित पालेकर यांच्यासह या तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, प्रसिद्ध गायिका हेमा सरदेसाई, माजी आमदार एलिना साल्ढाणा, इतिहासतज्ज्ञ प्रजल साखरदांडे व म्हादईप्रेमी उपस्थित होते.
सेव्ह म्हादई सेव्ह गोवा तसेच गोवा हेरिटेज ॲक्शन ग्रुपने मानवी साखळी या उपक्रमाचे आयोजन केले होते. मिरामार किनार ते सांतामोनिका जेटी अशी ७ किलोमीटर अंतराची ही मानवी साखळी साकारली जाणार होती. मात्र प्रत्यक्षात यात सहभागी झालेल्यांची संख्या ही अपेक्षेपेक्षा कमी होती.
आमदार सरदेसाई म्हणाले, की भाजपला कर्नाटकमध्ये धडा मिळाला. आता तरी भाजप सरकारने म्हादई प्रश्नी जागे व्हावे. म्हादईविषयी जागृती होणे गरजेचे असून लोकांनीही सर्व भेदभाव बाजूला ठेवून मोठ्या संख्येने अशा आंदोलनात सहभागी होण्याची गरज आहे. म्हादई वळवली तर त्याचा पर्यावरणावर घातक परिणाम होईल. लोकांना म्हादईबाबत प्रचंड भावना असल्या तरी सरकारची त्यांना भीती आहे, असे आमदार फेरेरा म्हणाले.