गोव्यात दीड लाखांचा भेसळयुक्त कलाकंद जप्त
By admin | Published: August 28, 2016 07:16 PM2016-08-28T19:16:35+5:302016-08-28T19:16:35+5:30
गुजरातहून आलेला 750 किलो व अन्य 55 किलो मिळून सुमारे दीड लाख रुपये किमतीचा मावा (कलाकंद) जप्त करण्यात आला.
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 28 - गणेशचतुर्थीच्या पार्श्र्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने मिठाईची दुकाने स्कॅनरखाली आणली असून रविवारी धडक कारवाईत गुजरातहून आलेला 750 किलो व अन्य 55 किलो मिळून सुमारे दीड लाख रुपये किमतीचा मावा (कलाकंद) जप्त करण्यात आला. मिठाई बनविण्यासाठी आणलेला हा कलाकंद निकृष्ट दर्जाचा असल्याचा एफडीएचा दावा असून तो ब्रॅण्डेड नव्हता, असे सांगण्यात आले.
मेरशी येथे रविवारी पहाटे जीए 05 बी 4014 या मारुती इको वाहनातून आणलेला दोन खोक्यांमधील 55 किलो मावा (कलाकंद) जप्त करण्यात आला. वास्तविक मावा आणताना तो शीतपेटीतून आणणो आवश्यक आहे; कारण दूध नाशवंत असल्याने तो मिठाईसाठी वापरल्यास आरोग्याला हानिकारक बनू शकते. वरील प्रकरणात तो उघडाच आणला जात होता तसेच तो ब्रॅण्डेडही नव्हता. कोठून आणला आणि तो कोणाला पोचवायचा आहे याची कागदपत्रेही नव्हती. करासवाडा, थिवी येथील रामा चौधरी याची कसून चौकशी केली असता राज्यातील काही मिठाईच्या दुकानांसाठी देण्याकरिता तो आणल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, रामा याच्याकडे अधिक चौकशी केली असता पुणो-गोवा नॉन एसी लक्झरीनेही आणखी मावा आणण्यात येत असल्याची माहिती अधिका:यांना मिळाली. त्यानुसार सापळा लावून एमएच 12 एचबी 2200 या लक्झरी स्लीपर बसची मडगाव स्थानकात झडती घेतली असता प्रत्येकी 30 किलोच्या 25 प्लास्टिक पिशव्यांमधून गुजरातमधून मावा आणण्यात आल्याचे आढळून आले. मेहसाना, गुजरात येथून मेसर्स वहानवटी स्वीट मार्टमधून हा मावा आणला होता. या पिशव्यांवर वहानवटी स्पेशल बर्फी अशी दिशाभूल करणारी लेबल्स होती. स्लीपर बसमध्ये बेडच्याखाली बेमालूनपणो या पिशव्या ठेवल्या होत्या.