पती-पत्नीकडून ३.५० कोटींचा गंडा; पोलिसांकडून अटक, फसवणूक झालेल्यांचे मुख्यमंत्र्यांपुढे गाऱ्हाणे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 08:15 AM2024-01-03T08:15:34+5:302024-01-03T08:18:21+5:30

या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी थेट चौकशीचे आदेश दिल्यानंतर काही तासांतच दोघांनाही फोंडा पोलिसांनी अटक केली आहे.

husband and wife looted for of 350 crores arrested by the goa police | पती-पत्नीकडून ३.५० कोटींचा गंडा; पोलिसांकडून अटक, फसवणूक झालेल्यांचे मुख्यमंत्र्यांपुढे गाऱ्हाणे

पती-पत्नीकडून ३.५० कोटींचा गंडा; पोलिसांकडून अटक, फसवणूक झालेल्यांचे मुख्यमंत्र्यांपुढे गाऱ्हाणे

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : फ्लॅट व भूखंड देण्याचे आमिष दाखवून विजयनाथ व विदिशा गावडे या दाम्पत्याने लोकांना चुना लावत तब्बल साडेतीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हे दोघेही आरोग्य खात्याचे कर्मचारी असून या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी थेट चौकशीचे आदेश दिल्यानंतर काही तासांतच दोघांनाही फोंडा पोलिसांनी अटक केली आहे.

फसवणूक झालेले लोक होंडा, साखळी, कुडणे, फोंडा भागातील आहेत. या लोकांनी काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. प्रत्येकाला १० लाखांपेक्षा अधिक रकमेचा गंडा घातलेला असून फसविले गेलेल्यांची संख्या वाढतच आहे.

मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या एकाने पत्रकारांशी बोलताना असे सांगितले की, दोडामार्ग येथे फ्लॅट देतो, असे सांगून त्यांच्याकडून १० लाख रुपये घेण्यात आले. दुसऱ्या एकाने सांगितले की, साखळी कॉलनीत फ्लॅट देण्याचे सांगून त्याच्याकडूनही १० लाख उकळून वर्षभर वेगवेगळी कारणे देत झुलवत ठेवले. सोने तारण ठेवून त्याने पैशांची व्यवस्था केली होती. काहीजणांनी पैसे देऊन दोन वर्षे उलटली आहेत. पैसे मागायला ती या दाम्पत्याच्या घरी जात असत तेव्हा एक तर त्यांना दमदाटी केली जायची किंवा छळाची तक्रार पोलिसात करीन, अशा धमक्या दिल्या जायच्या. आतापर्यंत फसवणुकीचा मामला साडेतीन कोटी रुपयांपर्यंत दिसत असला तरी ही रक्कम बरीच वाढण्याची शक्यता आहे.

या प्रकरणाने फुटली वाचा...

जमीन देण्याच्या बहाण्याने पती-पत्नीने आपली दहा लाखांची फसवणूक केल्याची तक्रार नागझर-कुर्डी येथील भिवा गावस यांनी फोंडा पोलिसांत दाखल केली. त्यानुसार विदिशा गावडे व विजयनाथ गावडे (रा. होंडा- सत्तरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, तपासात या दोघांचे अनेक कारनामे उघडकीस येत आहेत. गावस यांनी भूखंडापोटी त्या दोघांना दहा लाख रुपये घरी नेऊन दिल्याचे सांगितले. परंतु, संशयिताने भूखंड दिला नाही. त्याच्याकडून आपण फसवलो गेल्याची जाणीव होताच भिवा गावस यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

एका महिलेने अशी माहिती दिली की, फसवणूक करणारे दाम्पत्य तिचे नातेवाईक आहेत. सोयरे असल्याने थोडे थोडे पैसे द्या, असे सांगून तिच्याकडूनही मोठी रक्कम उकळण्यात आली. अन्य एका महिलेने सांगितले की, तिला वझरी येथे इमारत दाखवून त्या इमारतीत फ्लॅट देतो, असे सांगून १० लाख घेतले.

फसवणूक हाच बनला उद्योग

जमीन विक्रीच्या नावाखाली लोकांकडून पैसे उकळण्याचा या पती-पत्नीचा धंदा बनल्याची माहिती पुढे आली आहे. त्यांच्याविरुद्ध डिचोली व वाळपई पोलिस स्थानकात तक्रारी दाखल झाल्या आहेत. ताब्यात घेऊन चौकशी सुरू केल्यानंतर दोघांचे कारनामे उघड होत आहेत, फोंडा पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून निरीक्षक तुषार लोटलीकर यासंदर्भात पुढील तपास करत आहेत.

लोकांनी सावध राहावे : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अशा फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन जनतेला केले आहे. या प्रकरणात होंडा, साखळी, कुडणे भागातील फसवणूक झालेले २० ते २५ लोक मला भेटले. मी पोलिसांना चौकशीचे सक्त्त आदेश दिले आहेत. नोकऱ्या किंवा फ्लॅट देण्याच्या आमिषाने गंडा घालण्याचे प्रकार वाढले आहेत. जनतेने सावध रहायला हवे. आमदार, मंत्र्यांच्या नावानेही लोकांकडून पैसे उकळणारे आहेत. कोणीही या प्रकारांना बळी पडू नये.
 

Web Title: husband and wife looted for of 350 crores arrested by the goa police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.