कुकर्मे लपविण्यासाठी प्रियकराच्या मदतीने पतीचा केला खून: संशयिताला अटक
By सूरज.नाईकपवार | Published: March 27, 2024 06:31 PM2024-03-27T18:31:31+5:302024-03-27T18:32:12+5:30
त्या प्रियकराचा शोध चालू.
सूरज नाईकपवार ,मडगाव: आपली कुकर्मे लपविण्यासाठीच पत्नीने आपला पतीचा प्रियकराच्या मदतीने खून केल्याची खळबळजनक गोव्यातील सासष्टीतील पेडा बाणावली येथे घडली. विश्वनाथ सिंदाल (३५) असे मयताचे नाव असून, या खून प्रकरणात येथील कोलवा पोलिसांनी तिची पत्नी वैभवी उर्फ मंगलला अटक केली आहे. तर तिच्या प्रियकराचा सदया शोध चालू आहे. त्याच्या शोधासाठी कोलवा पोलिसांचे एक पथक कर्नाटकातील खानापुर येथेही पाठवून देण्यात आले आहे. पेडा बाणावली येथे खुनाची वरील घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी संशयित वैभवी हिच्याविरोधात भांदसंच्या ३०२ कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे.
पोलिस निरीक्षक सतीश पडवळकर यांंच्या मार्गदर्शनाखाली पुढील पोलिस तपास चालू आहे. मंगला हिचे एका युवकाकडे अनैतिक संबध हाेते. त्याबाबत विश्वनाथला चाहूल लागली होती. उभयंतामध्ये त्यावरुन वारवांर खटकेही उडत होते. या दोघांना एक चारवर्षाची लहान मुलगीही आहे. खुनाच्या घटनेनंतर वैभवी त्या मुलीला घेउन सोमवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर पडून खानापूर येथे आपल्या माहेरी गेली होती. खुनाची वरील घटना रविवारी घडली होती. विश्वनाथ हा भाडयाच्या घरात रहात होता.
मृतदेहाला मुंग्या लागल्या होत्या. घटनास्थळाहून एक युवक विश्वनाथ याची दुचाकी घेउन जातानाची छबी रस्त्यावरील सीसीटिव्हीत टिपली गेली होती. पोलिसांना तपासासाठी हा एक महत्वाचा आधार ठरला आहे. मयत विश्वनाथ हा टाईल्स फीटरचे काम करीत होता. त्याची आई सुरावली येथे रहात आहे. मंगळवारी दुपारी त्या आपल्या मुलाला जेवण घेउन आली असता, तिला हा प्रकार दिसून आला. नंतर तिने शेजाऱ्यांना बोलावून घेउन पोलिसांकडे तक्रार केली होती.
खुनाच्या घटनेनंतर वैभवी या परत गोव्यात आल्या होत्या. आपण पतीला वारवांर फोनवरुन संपर्क साधला मात्र पलिकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे चिंता होउन आपण येथे आल्याचे तिने सुरुवातीला पोलिसांना सांगून त्यांची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी शेवटी आपल्या खाक्या दाखविल्यानतंर तिने सर्व बाबी उघड केल्या.