दक्षिणेतील पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो: सदानंद तानावडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2024 07:52 AM2024-10-26T07:52:07+5:302024-10-26T07:53:18+5:30
लोकसभेच्या दोन्ही जागा भाजप जिंकणार, अशी आमची अपेक्षा होती. परंतु, दक्षिण गोवा मतदारसंघात १३ हजार मतांनी पराभव पत्करावा लागला.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यात भाजप उमेदवार पल्लवी धेंपो यांच्या झालेल्या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी एका मुलाखतीवेळी सांगितले.
ते म्हणाले की, लोकसभेच्या दोन्ही जागा भाजप जिंकणार, अशी आमची अपेक्षा होती. परंतु, दक्षिण गोवा मतदारसंघात १३ हजार मतांनी पराभव पत्करावा लागला. संघटनात्मकदृष्ट्या आम्ही कमी पडलो, हे मान्य करावेच लागेल. कुठल्या जाती, धर्माच्या लोकांनी कोणाला मतदान केले, या गोष्टीत मी जात नाही. संघटन बांधण्यासाठी मी कमी पडलो, म्हणून मी या पराभवाची जबाबदारी मी स्वतःवर घेतो.
सदस्य नोंदणीबाबात तानावडे म्हणाले की, सर्वच सदस्य आम्ही नव्याने करत आहोत. माझ्यापासून पंतप्रधानांपर्यंत सर्वांनीच नव्याने पक्षाचे सदस्यत्व घेतले आहे. आमची सदस्यता नोंदणी ऑनलाइन आहे. जेवढे मतदान झाले, तेवढे तरी सदस्य व्हावेत, यासाठी आमचा प्रयत्न आहे.
काँग्रेसचे आमदार फुटून भाजपत आले. त्यामुळे मतदार किंवा सदस्य वाढले का, असे विचारले असता आमदार पक्षात आला म्हणजे त्यांचा मतदारही येतो असे नव्हे, असे ते म्हणाले. २०२७ च्या निवडणुकीत विधानसभेची तिकीट मागणार का, या प्रश्नावर तानावडे म्हणाले की, राज्यसभेवर समाधानी आहे. मला राज्यसभेसाठी अजून वेळ द्यावा लागेल. मला हवे असते, तर २०२२ मध्ये तिकीट मिळाले असते. त्यावेळी मी प्रदेशाध्यक्ष होतो.
आतापर्यंत ३ लाख १४ हजार ३८२ सदस्य
दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल भाजप युवा मोर्चा कार्यकर्त्यांना संबोधित करताना भाजपचे आतापर्यंत ३ लाख १४ हजार ३८२ सदस्य झाले असल्याची माहिती दिली. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, युवाध्यक्ष समीर मांद्रेकर याप्रसंगी उपस्थित होते.