कोंकणी-मराठी एकत्र नांदणे मलाही मान्य!: दामोदर मावजो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2024 03:49 PM2024-09-03T15:49:42+5:302024-09-03T15:51:39+5:30

माझ्या विधानाचा विपर्यास केल्याने वाद; कोंकणीला 'बोली' म्हणणे अन्यायकारक, वेदनादायी

i also agree with konkani marathi together said damodar mavajo in lokmat goa exclusive interview | कोंकणी-मराठी एकत्र नांदणे मलाही मान्य!: दामोदर मावजो

कोंकणी-मराठी एकत्र नांदणे मलाही मान्य!: दामोदर मावजो

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : कोंकणी-मराठी पूर्वीपासूनच गोव्यात एकत्र नांदत आहेत. त्यांनी एकत्र नांदणे हे मलाही पूर्णपणे मान्य आहे. कोंकणी-मराठीत समन्वयाचीच भूमिका असायला हवी, पण कोंकणी ही मराठी भाषेची बोली असे म्हणून हिणवण्याची चूक गोव्यातील मराठीवाद्यांनी करू नये, अशी भूमिका ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक दामोदर ऊर्फ भाई मावजो यांनी मांडली. 

मावजो यांनी काल सोमवारी लोकमत'च्या पणजी कार्यालयास भेट देऊन संवाद कार्यक्रमात भाग घेतला. तुम्ही मराठीविरुद्ध बोलला होता का? असे मुलाखतीवेळी मावजो यांना विचारले असता ते म्हणाले की, मी मुळीच मराठीविरुद्ध बोललो नाही. मी कधीच बोलणार नाही. कोंकणीला एकदम जवळची भाषा ही मराठी आहे. माझी मातृभाषा कोंकणी आहे पण मी मराठी चांगली बोलतो व चांगली लिहितो. मी बालपणी शाळेत मराठी शिकलो. पोर्तुगीजही शिकलो. अलिकडे माझे अनेक चर्चात्मक कार्यक्रम महाराष्ट्रात झालेले आहेत.

मला एका पत्रकाराने राजभाषा कायद्याविषयी विचारल्याने 'मी फक्त कोंकणी हीच एकमेव राजभाषा आहे व तीच एकमेव राजभाषा असावी, असे म्हटले होते पण थोडे चुकीचे छापून आले. राजभाषा कायद्यात मराठी नको ही भूमिका आम्ही १९८७ साली मांडली होती हेही खरे आहे पण राजभाषा कायदा अस्तित्वात आल्यानंतर मीही वाद सोडून दिला व साहित्य निर्मितीच्याच कामासाठी स्वतःला वाहून घेतले.

मावजो म्हणाले की, महाराष्ट्रातील मराठी लेखक व तेथील मराठी भाषिक माझा आज देखील पूर्ण आदर करतात. पण, गोव्यातील काही मराठीप्रेमींनी सध्याच्या वादात माझ्याविषयी चुकीचा समज करून घेतला, याबाबत मला वाईट वाटते. काही चांगले मराठीप्रेमी केवळ एका प्रतिक्रियेमुळे किंवा बातमीमुळे माझ्याविषयी चुकीचा समज करून बसले. काहीजण तर कोंकणी मराठीची बोली आहे, असे अन्यायकारक बोलून मोकळे झाले, असे मावजो म्हणाले.

मावजो म्हणाले की, गोव्यात पोर्तुगीज काळापासून मराठीचा वापर केला जातो. एकेकाळी गोव्यातील हिंदू समाजाने धार्मिक व आध्यात्मिक कारणांसाठी मराठी भाषा स्वीकारली व खिस्ती समाजाने पोर्तुगीज स्वीकारली होती. पण नंतर कोंकणीचा स्वीकार सर्वांनी केला. तरी देखील आज सुद्धा बहुतांश हिंदू समाज त्यांची संस्कृती व धर्म व अध्यात्म यासाठी मराठीचाच वापर करतात. मी त्याविरुद्ध नाही. पण केवळ त्यासाठी म्हणून ती राजभाषा ठरत नाही. जी भाषा बोलली जाते तीच राजभाषा, गोवा राजभाषा कायद्यात मराठीला राजभाषेचे स्थान नको, असे मी म्हणतोय. मराठीतून जर कुणी सरकारला पत्र पाठवले तर सरकारने मराठीतून उत्तर द्यावेच, असे मावजो म्हणाले.

हिणवणे थांबवावे 

कोंकणी-मराठीने एकत्र नांदाये या मताचा मी आहे. केवळ गोव्यातच नव्हे तर देशातही एकत्र नांदावे. कोंकणी- मराठीत समन्वयाचीच भूमिका असावी पण ती एकतफी असू नये. केवळ कोंकणीप्रेमीच समन्वयाची भूमिका घेतील व मराठीवादी मात्र कोंकणीला बोली म्हणूनच हिणवत राहतील तर ते गैर आहे. ते मात्र मला मान्य होणार नाही, असे मावजो म्हणाले.

मी अवमान केलाच नाही 

आपल्या मराठी संबंधीच्या वक्तव्यावरून वाद निर्माण होणे हे फार चुकीचे असल्याचे मावजो म्हणाले. कोंकणी- मराठीचे असलेले जिव्हाळ्याचे नाते कायम टिकून राहावे, असे मला वाटते. एका पत्रकाराने मला राजभाषा कायद्याविषयी विचारले होते आणि त्यानुसार आपण उत्तर दिले आहे. राजभाषा कायद्यानुसार एका राज्याच्या दोन भाषा असू शकत नाहीत. राजभाषा कायद्याची तंतोतंत अंमलबजावणीचा आग्रह धरणे म्हणजे मराठीचा अवमान नव्हे, असे ते म्हणाले.

म्हणून कोंकणी थोडी मागे पडली 

मराठीला जसे संत साहित्य आणि मोठे संत लाभले तसे कोंकणीला लाभले नाही. हे देखील एकेकाळी कोंकणी मराठीपेक्षा थोडी मागे राहण्याचे कारण आहे. पोर्तुगीजांनी गोमंतकीयांचा इतका छळ केला की लोक साहित्य निर्मिती करण्याच्या भानगडीत पडलेच नाहीत. त्यावेळी केवळ या छळातून कशी सुटका होईल, याचाच विचार केला. मात्र कालांतराने कोंकणीला मोठा लोककलेचा, लोकभाषेचा, लोकाविष्काराचा वारसा लाभला, असे मावजो यांनी नमूद केले.

बोरकरांवर अन्याय झाला

ज्येष्ठ साहित्यिक बा. भ. बोरकर हे माझे साहित्यातील गुरु आहेत. त्यांनी जे संघर्षमय जीवन जगले ते मी जवळहून पाहिले आहे. खरंतर ते ज्ञानपीठ पुरस्काराचे खरे मानकरी होते, परंतु त्यांच्यावर भाषावादामुळे अन्याय झाला. त्यांना मराठी साहित्यासाठी ज्ञानपीठ मिळणे गरजेचे होते. त्यांच्यासोबत असे अनेक मराठी साहित्यिक आहेत, जे इतर भाषेवर प्रेम करत असल्याने पुरस्कारापासून त्यांना दूर करण्यात आले, असेही मावजो म्हणाले.

रोमीचा आदर आहे पण...

कोंकणी ही रोमी लिपीतूनही लिहिली जाणे यात काहीच चुकीचे नाही, परंतु त्यामुळे ही लिपी राजभाषा कायद्यात समावेश करता येणार नाही. रोमीसाठी जे आज आवाज उठवतात त्यात कुणी लेखकही नाहीत, असे मावजो म्हणाले.

पोर्तुगीजांचा सेन्सॉर...

पोर्तुगीजांनी केवळ पोर्तुगीज भाषा शिकवण्यावर भर दिला. यातून त्यांनी इतर भाषेवर निर्बंध आणले. कोंकणी, मराठी, इंग्रजी किंवा इतर कुठल्याही भाषेत साधी लग्नपत्रिका देखील छापायची झाल्यास ती इतरांना देण्याआधी पोर्तुगीजांकडून तपासली जायची. यातून तियात्र देखील सुटलेले नाही. गोव्यात आलेल्या मिशनरींनी यांनीही कोंकणी भाषेतील साहित्य नष्ट करण्यास सुरुवात केली. फादर स्टीफनने ख्रिस्तपुराण मराठीत लिहिले किंवा ते मराठीत लिहिण्याचा प्रयत्न झाला हे मी मान्य करतो असे मावजो म्हणाले.

'लोकमत'चे नियमित वाचन

मी लोकमत नियमितपणे वाचतो. भाषावादाबाबत 'लोकमत'मध्ये प्रसिद्ध झालेला संदेश प्रभुदेसाय यांचाही कालचा लेख वाचला. मी मराठीचा विरोधक नव्हे, कोंकणी माझी मातृभाषा आहे व आज मी लोकमत मध्ये देखील शुद्ध मराठीतच बोलत आहे, असे मावजो म्हणाले. मी कोंकणीतून चांगल्या प्रकारे साहित्य निर्मिती करू शकतो, कारण ती माझी मातृभाषा आहे. आजची मुले देवनागरी कोंकणी वाचतात हा माझा अनुभव आहे, असेही मावजो म्हणाले.

 

Web Title: i also agree with konkani marathi together said damodar mavajo in lokmat goa exclusive interview

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.