मी स्ट्राँग नेता म्हणून टार्गेट केले जातेय, तज्ज्ञांशी चर्चेने निर्णय घेऊ: मंत्री विश्वजित राणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 07:27 IST2025-03-22T07:26:50+5:302025-03-22T07:27:40+5:30
नगर विकास कायद्याच्या कलम १७(२) प्रकरणी एनजीओंनी केलेल्या निदर्शनांबाबत पत्रकारांनी विचारले असता विश्वजित यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

मी स्ट्राँग नेता म्हणून टार्गेट केले जातेय, तज्ज्ञांशी चर्चेने निर्णय घेऊ: मंत्री विश्वजित राणे
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'मी स्ट्राँग नेता म्हणून मला टार्गेट केले जात आहे. आम्ही खरेतर राज्याच्या हिताच्याच गोष्टी करतोय,' असे नगर विकासमंत्री विश्वजित राणे यांनी एनजीओंच्या आंदोलनावर तीव्र प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. 'ऊठसूट प्रत्येक विषयावर एनजीओ असे रस्त्यावर येत असतील तर त्यांनीच सरकार चालवू दे, आम्ही घरी बसतो,' असा उद्वेगही त्यांनी व्यक्त केला.
नगर विकास कायद्याच्या कलम १७(२) प्रकरणी एनजीओंनी केलेल्या निदर्शनांबाबत पत्रकारांनी विचारले असता विश्वजित यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, "हायकोर्टाने दिलेल्या आदेशाला आव्हान देण्यासाठी आमच्याकडे सहा आठवड्यांची मुदत आहे. आम्ही त्या अनुषंगाने विचारही करीत आहोत. सरकार तसेच कायदा तज्ज्ञांकडे सल्लामसलत करून व एकत्रपणे चर्चा करूनच योग्य तो निर्णय घेतला जाईल. कोणताही नेता स्ट्राँग असला की त्याला टार्गेट केले जाते. तसाच प्रकार माझ्या बाबतीत होत आहे."
ते म्हणाले की, "नगर नियोजन कायद्याचे कलम १७ (२) व ३९ (अ) ही दोन्ही कलमे राहतील. परंतु, याआधी झालेल्या भू रूपांतरणांबद्दल त्यांनी काही भाष्य केले नाही." दरम्यान, राखीव व्याघ्र क्षेत्राबाबत विचारले असता सोमवारपासून सुरू होणार असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबद्दलची मी दिलेली माहिती सभागृहाला मिळेल, असे विश्वजित राणे यांनी यावेळी सांगितले.
योग्यवेळी नावे जाहीर करू
विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी १७(२) कोणी जमिनी रूपांतरित केल्या, त्यांची नावे जाहीर करा, असे जे आव्हान दिले आहे, त्याबद्दल विचारले असता राणे म्हणाले की, "या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी विधानसभा अधिवेशन हेच योग्य व्यासपीठ आहे. विरोधी पक्ष १७(२) बाबत ओरड करीत आहेत. परंतु, खरेतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही या कलमाचा लाभ घेतला आहे. त्यांची नावे मी योग्य वेळी विधानसभेत जाहीर करीन.
विरोधकांकडे मुद्देच नाहीत
मंत्री राणे म्हणाले की, "मला टीसीपीवरून तर मुख्यमंत्र्यांना खाजगी वनक्षेत्रावरून टार्गेट केले जात आहे. विरोधी पक्षांकडे कोणतेही मुद्दे राहिलेले नाहीत. तामनार, रेल दुपदरीकरण आदी विकास प्रकल्पांना विरोध केला जात आहे. विरोधी पक्षात आमदार खूश नव्हते म्हणूनच ते आमच्याकडे आले."