आहे त्या पदावर मी खूश: सभापती रमेश तवडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 11:07 AM2023-03-15T11:07:25+5:302023-03-15T11:07:38+5:30
पुढील निवडणुकीचा विचार करुन तुम्हाला मोठे पद देण्याचा विचार चालला असल्याची चर्चा आहे? असे त्यांना विचारले असता, त्यांनी असे उत्तर दिले.
संजय कोमरपंत, लोकमत न्यूज नेटवर्क काणकोण: मी सामान्य कार्यकर्ता आहे. मी कोणत्याच राजकीय शर्यतीत नाही. राजकीय शर्यतीत उतरणेही मला आवडत नाही. सध्याच्या पदावरच मी खूश आहे, असे सभापती रमेश तवडकर यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
पुढील निवडणुकीचा विचार करुन तुम्हाला मोठे पद देण्याचा विचार चालला असल्याची चर्चा आहे? असे त्यांना विचारले असता, त्यांनी असे उत्तर दिले.
आपण आयोजन करत असलेला भव्य असा लोकोत्सव आदिवासी समुदायात कोणीच इतका यशस्वी केला नाही. या कामात यशस्वी ठरल्यानेच भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी खुल्या कंठाने प्रशंसा केल्याचे ते म्हणाले, श्रमधाम योजनेबाबत ते म्हणाले, यापूर्वी कमलाकर गावकर यांचे घर अवघ्या ३३ दिवसांत बांधून दिल्याचे लोकांनी पहिले आहे. आता १४ घरे बांधण्याचा संकल्प केला आहे. त्या १४ व्यक्तींची परिस्थिती लोकांनी पाहिली आहे. या कुटुंबाना खरंच आपला मदतीचा हात द्यायला हवा, असे त्यांना वाटत असल्याने, दात्यांनी आपली मदत दिली आहे. ही १४ घरे पूर्ण झाल्यानंतर आणखी ८५ घरे बांधण्याचा संकल्प आहे. बलराम शिक्षण संस्थेच्या शिक्षकांनी आपले एक दिवसाचे वेतन या गरीब परिवाराचे घर उभारण्यास मदत व्हावी, म्हणून दिले आहे.
ते म्हणाले, जेव्हा मते मागायला जायचो, तेव्हा त्यांची परिस्थिती मनात खंत दिसायची. तेव्हाच निश्चय केला होता. निवडणुकीत जिंकू किंवा हरू मात्र या गोरगरिबांना त्याचा हक्काचा आसरा देण्याचा संकल्प केला होता. आता या कामाला जनतेच्या आर्थिक बळाची जोड मिळत आहे, हे चांगले आहे.
अरुंद व धोकादायक करमलघाट रस्त्यासंबंधी ते म्हणाले, नुकतीच केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या ओएसडीनी या रस्त्याची पाहणी केली. तसेच आपण पत्रव्यवहार सुरु ठेवला होता. करमलघाट ते गुळेपर्यंतच्या रस्ता दुरुस्तीसाठी साडेपाच कोटी रुपये मंजूर झाल्याचे सांगून एप्रिल ते मे महिन्यात येथील धोकादायक वळण कापण्याच्या कामाला सुरुवात होईल, असे त्यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"