'चौकशीला सामोरे जाण्यास मी तयार': विजय सरदेसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2024 10:36 AM2024-04-29T10:36:57+5:302024-04-29T10:37:52+5:30
मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे, असे आव्हान आमदार विजय सरदेसाई यांनी दिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : 'व्हायरल ऑडिओ क्लीपमध्ये खाणबंदीच्या कथित कट कारस्थानाबाबत केलेले आरोप मुख्यमंत्र्यांना जर खरे वाटत असतील तर त्यांनी खोलात जाऊन खुशाल चौकशी करावी. मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे,' असे आव्हान आमदार विजय सरदेसाई यांनी दिले आहे.
'माझा खाण व्यवसायाशी किंवा खाणमालकांशी कोणताही संबंध नाही, खाणमालकांची कोणतीही बैठक मी माझ्या घरी कधीही घेतलेली नाही' असेही सरदेसाई यांनी स्पष्ट केले. सरदेसाई म्हणाले की, 'खाणमालकांनीच पर्यावरणप्रेमी क्लॉड आल्वारिस यांना बरोबर घेऊन खाण व्यवसाय बंद पाडला हे न पटण्यासारखे आहे. खाणमालक बक्कळ पैसा कमावत होते. ते खाणी बंद का करतील? माझा खाण धंद्याकडे काहीही संबंध नाही. राज्यातील खाणी २०१२ साली बंद झाल्या. तब्बल १२ वर्षांनी हा विषय कसा वर आला?', असा प्रश्नही सरदेसाई यांनी केला.
दरम्यान, सरदेसाई लंडन दौऱ्यात भाषणे ठोकून आल्यानंतर लंडनच्या गोमंतकीयांनी आरजीच्या लंडनमधील समर्थकांनी इंडिया आघाडीचे उमेदवार विरियातो फर्नांडिस यांना समर्थन दिल्याचे विचारले असता सरदेसाई म्हणाले, 'आरजीने मते फोडण्यासाठीच उमेदवार उभे केले आहेत हे आता लपून राहिलेले नाही व ते लंडनमधील गोमंतकीयांनाही पटलेले आहे.'
निवडणूक आहे म्हणून...
सध्या लोकसभा निवडणुकीचे दिवस असल्याने अशा प्रकारचे बदनामी करणारे ऑडिओ किंवा व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. मुख्यमंत्र्यांनी ज्या ऑडिओ क्लीपचा उल्लेख केलेला आहे त्या क्लीपमधील आवाज आपला नसल्याचे विरियातो यांनी स्पष्ट केले.