मी भाजपाविषयी भावनिक झालोय : पार्सेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 01:33 PM2019-03-15T13:33:52+5:302019-03-15T13:34:12+5:30
मी 30 वर्षे भारतीय जनता पक्षासाठी काम केले आहे. मी भाजपविषयी भावनिक झालेलो आहे.
पणजी : मी 30 वर्षे भारतीय जनता पक्षासाठी काम केले आहे. मी भाजपविषयी भावनिक झालेलो आहे. मी हा पक्ष सोडू शकत नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ भाजप नेते व माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शुक्रवारी लोकमतपाशी आपल्या भावना व्यक्त केल्या.
दयानंद सोपटे यांना काँग्रेसमधून आणले व भाजप त्यांना विधानसभेच्या पोटनिवडणुकीला तिकीट देत आहे याची जाणीव झाल्यानंतर पार्सेकर यांनी गेले काही महिने भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांना टीकेचे लक्ष्य बनविले होते. पार्सेकर यांनी आपण प्रसंगी अपक्ष लढेन अशा प्रकारचे संकेत आपल्या कार्यकत्र्याना दिले होते. भाजपच्या मांद्रेतील बहुतेक कार्यकत्र्याना आपल्यासोबत ठेवण्यातही पार्सेकर यांना यश आले होते. तथापि, ते भाजपच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध मांद्रेत पोटनिवडणूक लढवतीलच अशी हवा निर्माण झाली होती. याच पार्श्वभूमीवर पार्सेकर यांनी आता नरमाईचे धोरण स्वीकारले आहे.
पार्सेकर म्हणाले, की आम्ही भाजपचे काम करताना अनेक खस्ता खाल्ल्या. अनेक चांगले वाईट अनुभव घेतले. केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार दुस-यांदा अधिकारावर यायला हवे असा उदात्त हेतू मी आता समोर ठेवला आहे. मी माझ्या कार्यकर्त्यांना समजावीन. भाजप सोडणे माझ्यासाठी कठीण आहे, कारण माझी सगळी कारकीर्द याच पक्षात घडली.
सोपटे यांना काँग्रेसमधून भाजपामध्ये आणण्याची चूक ही एका व्यक्तीने केली आहे. एक व्यक्ती चुकीच्या पदावर बसली आहे व त्या व्यक्तीने ती चूक केली. त्यासाठी मी पूर्ण पक्षाला कधीच दोष दिला नाही व आताही देत नाही. मी भाजपासोबतच राहीन. पक्षाने माझ्यावर उमेदवार निवड समितीचे एक सदस्य म्हणूनही जबाबदारी दिली आहे.