मी आजही कुडतरीतून निवडून येऊ शकतो! चचिल आलेमाव याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 12:29 PM2023-05-01T12:29:23+5:302023-05-01T12:29:56+5:30
चर्चिल आलेमाव यांनी कुडतरी मतदारसंघात त्यांच्या कार्यकर्त्यांच्या घरी 'मन की बात' कार्यक्रम बघितला.
लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : सासष्टी तालुक्यात बाणावलीप्रमाणे कुडतरी मतदारसंघातही आपले कार्यकर्ते, समर्थक व मोठ्या संख्येने मतदार आहेत. त्यामुळे आपण कुडतरी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविल्यास निवडून येऊ शकतो, असा दावा माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांनी काल पत्रकारांशी बोलताना केला.
चर्चिल आलेमाव यांनी कुडतरी मतदारसंघात त्यांच्या कार्यकर्त्यांच्या घरी 'मन की बात' कार्यक्रम बघितला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आलेमाव म्हणतात, सासष्टी तालुक्यात आपण अॅड. राधाराव ग्रासियस, स्व. आंतोन गावकर, तसेच आपले बंधू ज्योकीम आलेमाव यांच्यासह १३ आमदारांना निवडून आणले आहे. कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांचाही त्यात समावेश आहे. लोटलीतून स्व. आंतोन गावकर यांचा पराभव करून अॅड. राधाराव ग्रासियस यांना आपण निवडून आणले, तर कुडतरीतून फ्रान्सिस सार्दीन यांचा पराभव करून स्व. आंतोन गावकर यांना निवडून आणले. कुडतरीत आपले असंख्य प्रेमी व मर्जीतील मतदार असल्याचे त्यांनी सांगितले.
मी सांगितले म्हणून रेजिनाल्डला मते मिळाली
आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी कोमुनिदादच्या मालकीच्या शेतजमिनी बळकावल्याचा खटला डॉ. एर्नेस्टने त्यांच्यावर न्यायालयात दाखल केला होता. ज्यावेळी आपण 'सेव्ह गोवा पक्ष स्थापन केला त्यावेळी आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले. त्यावेळी लोकांनी त्यांना विरोध केला होता; पण आपण लोकांची समजूत काढून त्यांना निवडून आणले. हे आलेक्स रेजिनाल्ड नाकारू शकणार नाही, असे आलेमाव म्हणाले.
बाणावलीतून सावियो लढेल
बाणावलीत यापुढे मी नाही, माझा पुत्र सावियो विधानसभा निवडणूक लढविणार आहे. लोकसभेच्या रिंगणात उतरण्याबाबत किंवा भाजप प्रवेशाबाबत कोणताही निर्णय मी अजून घेतलेला नाही. वालांका नावेली मतदारसंघावरच लक्ष केंद्रित करणार आहे. अवघ्या काही मतांनी तिचा पराभव झालेला आहे. तिने आपले काम सुरूच ठेवले आहे. लोकसभेच्या रिंगणात तिला उतरवणार नाही, असे चर्चिल म्हणाले.
...तर जाहीरपणे प्रवेश करीन
भाजप प्रवेश करायचा झाला तरी लपूनछपून करणार नाही. जाहीरपणे सर्वांना सांगेन आणि मगच प्रवेश करीन; परंतु अजून तसा कोणताही निर्णय मी घेतलेला नाही, असे चर्चिल आलेमाव यांनी यावेळी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"