मी आमदार झालो नव्हतो, तेव्हापासून गरजूंना घर बांधण्यास मदत करत होतो - मंत्री गोविंद गावडे
By समीर नाईक | Published: May 30, 2024 03:22 PM2024-05-30T15:22:36+5:302024-05-30T15:23:24+5:30
प्रियोळ प्रगती मंचच्या सहाय्याने आम्ही गरजूंना घरे बांधून देण्यासाठी खूप पूर्वीपासून काम केले आहे.
पणजी: श्रमधाम हे आता राज्यात प्रसिद्ध होत आहे. पण मी जेव्हा समाजकार्यात होतो, आणि मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता की मी आमदार होणार, तेव्हापासून लोकांना घरे बांधून देण्यास मदत करत होतो. पण केव्हाच याचा बोलबाला केला नाही, किंवा प्रसिध्दी घेतली नाही, असे प्रतिपादन कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी केले.
प्रियोळ प्रगती मंचच्या सहाय्याने आम्ही गरजूंना घरे बांधून देण्यासाठी खूप पूर्वीपासून काम केले आहे. यापूर्वी असे कुणीच केले नव्हते. केवळ प्रियोळमध्येच नाही तर मडकई मतदार संघात देखील आम्ही अनेक घरे उभारली आहे, किंवा घर उभारण्यास लहान मोठी मदत केली आहे. पण आता या गोष्टींना प्रसिध्दी मिळत आहे, किंवा अनेकजण प्रसिध्दी घेत आहेत, असे म्हणता येईल, असे गावडे यांनी यावेळी सांगितले.
श्रमधाम ही खरोखरच चांगली योजना आहे. या योजने अंतर्गत जर एखाद्या गरजूला राहायला, संसार करायला घर मिळत असेल तर या गोष्टीचे माझ्या प्रियोळ मतदार संघात स्वागतच आहे. पण उगाच प्रसिध्दीसाठी किंवा राजकारण करण्यासाठी लोकांचा उपयोग करून हे अश्या गोष्टी कुणीही करू नये. काही महिन्यांपूर्वी माझ्याकडे अशीच एक व्यक्ती आली होती, ज्यांचे घर मोडकळीस आले होते, आणि पावसात पडण्याची शक्यता होती. त्या व्यक्तीला मदत करण्याचे मी ठरविले, आवश्यक सामग्री देखील ऑर्डर केली. पण ४ ते ५ दिवसात मला कळाले की श्रमधाम अंतर्गत त्या व्यक्तीचे घर येत आहे. पण नंतर झाले असे की श्रमधाम अंतर्गत त्यांचे घर झाले नाही, आणि मी करणार होतो ते ही नाहीसे झाले. त्यामुळे या गोष्टी करताना स्थानिक नेत्यांमध्ये समतोल असणे आवश्यक आहे, असेही गावडे यांनी यावेळी सांगितले.