मी रस घेतला नाही, अन्यथा सरकार पाडणे शक्य होते : राणे
By Admin | Published: April 16, 2016 02:37 AM2016-04-16T02:37:44+5:302016-04-16T02:40:57+5:30
पणजी : भाजप सरकारमध्ये असलेला असंतोष हा नवा नाही. मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री असतानाही असंतोष होता आणि
पणजी : भाजप सरकारमध्ये असलेला असंतोष हा नवा नाही. मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री असतानाही असंतोष होता आणि आताही त्याची प्रचीती येत आहे. उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्यासह अन्य काहीजणांची वक्तव्ये पाहिल्यास ही गोष्ट कळून येतेच. मात्र, काँग्रेस पक्षाने भाजपमधील असंतोषाला कधी प्रोत्साहन दिले नाही आणि खतपाणीही घातले नाही. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याशी माझे व्यक्तिगत स्तरावर खूप चांगले संबंध आहेत. मी कधीच त्यांचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला नाही. मी त्याबाबत रस दाखवून पुढाकार घेतला असता तर गेल्या चार वर्षांत भाजपचे सरकार पाडणे कधीच शक्य झाले असते, असे विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणे यांनी शुक्रवारी सांगितले.
आल्तिनो येथील खासगी निवासस्थानी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीवेळी राणे म्हणाले, की पार्सेकर यांना मी सहकार्य केले; पण विधानसभेच्या गेल्या अधिवेशनात सरकारच्या काही चुकीच्या निर्णयांवर व गैरकारभारावरही मी कठोरपणे बोललो. विशेषत: भूसंपादन न करता कोमुनिदाद जमिनीतील व अन्य ठिकाणची घरे कायदेशीर करण्याचा सरकारचा विचार चुकीचा आहे. मोठ्या प्रमाणात बेकायदा बंगलेही उभे राहात आहेत. प्रादेशिक आराखडाच अस्तित्वात नसल्याने बेकायदा बांधकामांना ऊत आला आहे. बेरोजगारांना भत्ता देण्याचे आश्वासन भाजपने २०१२ साली दिले होते; पण काहीच केले नाही. उलट खनिज खाणी बंद केल्या. आता सरकारला जाग आली व प्रादेशिक आराखडा तयार करण्याची भाषा सरकार करतेय. पण ते निवडणुकीपर्यंत होईल, असे वाटत नाही. (पान ७ वर)