गोमंतकीय श्रोत्यांविषयी माझ्या मनात विशेष आत्मीयता: महेश काळे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 12:53 PM2023-12-05T12:53:12+5:302023-12-05T12:54:44+5:30
सिद्धनाथ पर्वतावर महेश काळे यांचा कार्यक्रम रंगला
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : बोरी येथील १५०० फूट उंचावर असलेल्या सिद्धनाथ पर्वतावर निसर्गरम्य वातावरणात आयोजित करण्यात आलेल्या स्पंदन पर्व या कार्यक्रमातून महेश काळे यांनी रसिकांना एकापेक्षा एक अजरामर असलेली गाणी सादर करून अडीच तास खिळवून ठेवले.
बोरी तसेच अन्य भागातून विशेष महेश काळे यांच्या गायकीचा आनंद घेण्यासाठी रसिकांनी सिद्धनाथ पर्वतावर मोठी गर्दी केली होती. मुद्रा प्रतिष्ठान, बोरी नवदुर्गा संस्थान तसेच कला व संस्कृती संचालनालय व पर्यटन खाते यांच्या संयुक्त विद्यमाने स्पंदन पर्व सहाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन सावर्डेचे आमदार डॉ. गणेश गावकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी सागर जावडेकर, श्याम प्रभू देसाई तसेच मुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद पैदरकर उपस्थित होते.
यावेळी गणेश गावकर म्हणाले, गोव्याचे खरे सौंदर्य समुद्रकिनारे नसून तर गावातील खेड्यापाड्यात निसर्ग सौंदर्य आहे. याचा आनंद पर्यटकांनी घ्यायला हवा. यावेळी मिलिंद पैदरकर यांनी हा कार्यक्रम सिद्धनाथ पर्वतावर आयोजित करण्यामागचे कारण सांगितले. पहिल्या सत्रात प्रताप पाटील, कुणाल पाटील व भक्तराज पाटील यांचा मृदंग वादनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर महेश काळे यांचा स्वरयात्रा हा कार्यक्रम झाला
मी गोव्यात जन्म घेतलेला नाही. तरी गोव्यावर व गोमंतकीय श्रोत्यांवर माझे विशेष प्रेम व आत्मीयता आहे. गोमंतकीयांनी नेहमीच कलाकारांना भरभरून दाद दिली आहे. माझे गुरू पंडित जितेंद्र अभिषेकी यांची जन्मभूमी गोवा असल्यामुळे मला गोव्यावर विशेष प्रेम आहे. रसिकांनी मला भरभरून दाद दिली आहे. कार्यक्रमाच्या दोन दिवस अगोदर जेव्हा हे स्थळ पाहण्यासाठी मी आलो, तेव्हा मला वाटले की, या घनदाट जंगलात काळोखात व एवढ्या उंच भागावर कोण माझे गाणे ऐकायला येणार, मात्र, आज लोकांची अफाट गर्दी पाहून मी पावन झालो. गोवेकरांच्या मनात माझ्याविषयी किती प्रेम आहे हे पाहून मी पावन झालो. श्रोते माझ्यावर किती भरभरून प्रेम करतात, याची मला प्रचिती आली. - महेश काळे