भाजपमध्ये जाण्याचा रस्ता मला ठाऊक आहे, परंतु मी जाणार नाही! विजय सरदेसाई यांची स्पष्टोक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2024 09:36 AM2024-02-01T09:36:00+5:302024-02-01T09:36:23+5:30
कोणतेही पाऊल उचलण्याआधी लोकांना कल्पना देईन.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: देवाने सांगितले म्हणून कुठल्याही पक्षात मी लपून छपून जाणार नाही. लोकांना आधी कल्पना देईन, भाजपमध्ये जाण्याचा रस्ता मला माहिती आहे. परंतु मी जाणार नाही, अशा शब्दात गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी भाजपप्रवेशाची किंवा भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये 'विलिनी'करणाची शक्यता फेटाळून लावली.
पत्रकार परिषदेत विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना सरदेसाई म्हणाले की, विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन तोंडावर असल्याने अशा प्रकारच्या अफता पिकवल्या जात आहेत. परंतु गोवेकरांच्या प्रत्येक विषयावर सभागृहात सरकारला जाब विचारणार आहे.
मी प्रवेशासाठी प्रयत्न केल्याचे भाजपच्या एका तरी जबाबदार पदाधिकाऱ्याने पुढे येऊन सांगावे, असे आव्हानही त्यांनी दिले. सरदेसाई पुढे म्हणाले की, माझा स्वतःचा पक्ष आहे. कुठे जायचे असेल तर छुप्या पध्दतीने जाणे माझ्या स्वभावात नाही, गोवा फॉरवर्ड लोकसभेची निवडणूक लढवणार नाही, हे मी आधीच स्पष्ट केले आहे. आमच्या पक्षाकडे तेवढा पैसा नाही आणि इतरांप्रमाणे निवडणूक लढवण्यासाठी भीक मागण्याची आम्हाला सवय नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
सत्ता आणि पदे उपभोगण्यासाठी देवाचे नाव घेऊन पक्ष बदलणारा मी नाही, मला जे काही करायचे आहे ते मी माझ्या लोकांना विश्वासात घेऊन करेन. मी माझ्या मतदारसंघांच्या सर्वागिण विकासासाठी कटिबध्द आहे. लोकांचा माझ्यावर विश्वास असल्यामुळेच ते माझ्या पाठिशी असून मला पक्ष बदलण्याची गरज नसल्याचे सरदेसाई म्हणाले.
विकासात मी पुढेच...
याआधी काँग्रेस आमदार आपल्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी म्हणून भाजपत गेले. तसे काही तुमच्या बाबतीत घडणार आहे की, असे विचारले असता सरदेसाई म्हणाले की, फातोड्यांचा आणखी काय विकास करणार, जे काही करायचे आहे ते मी करून घेतलेले आहे.