पुढील निवडणुकीत निवृत्त होणार अशा ज्येष्ठ आमदाराला सभापतीपद द्या - लोबो
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 01:23 PM2019-05-03T13:23:52+5:302019-05-03T13:28:30+5:30
‘सभापतीपदी मला कायम राहायचे नाही. मी या पदासाठी शर्यतीतही नाही. राजकारणात जो निवृत्तीकडे झुकलेला आहे व पुढील निवडणुकीत निवृत्त होणार आहे अशा एखाद्या ज्येष्ठ आमदाराकडे हे पद सोपविले जावे असे मी पक्षाला स्पष्टपणे सांगितले आहे.’
पणजी - ‘सभापतीपदी मला कायम राहायचे नाही. मी या पदासाठी शर्यतीतही नाही. राजकारणात जो निवृत्तीकडे झुकलेला आहे व पुढील निवडणुकीत निवृत्त होणार आहे अशा एखाद्या ज्येष्ठ आमदाराकडे हे पद सोपविले जावे असे मी पक्षाला स्पष्टपणे सांगितले आहे’, असं गोव्याचे हंगामी सभापती मायकल लोबो यांनी स्पष्ट केलं आहे.
लोबो म्हणाले की, ‘सभापतीपदावर असल्यानंतर विधानसभेत किंवा सभागृहाबाहेर अथवा प्रसार माध्यमांसमोर गोव्याचे किंवा इतर प्रश्न उपस्थित करता येत नाही. या पदावरील व्यक्तीला तटस्थ रहावे लागते. ते मला शक्य होणार नाही.’
‘मुख्यमंत्री बनायची इच्छा, परंतु पक्षाने अजून संधी दिली नाही’
दरम्यान, मला मुख्यमंत्री बनायची इच्छा आहे, परंतु पक्षाने अद्याप संधी दिलेली नाही, असे सांगून लोबो यांनी आणखी एका विषयाला तोंड फोडले आहे. सभापती निवडीसाठी विधानसभेचे खास अधिवेशन बोलावण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आपल्याला कोणताही संदेश आलेला आलेला नाही. 23 मे रोजी चारही विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतरच अधिवेशन घेतले जावे कारण चाळीसही आमदारांची पूर्ण संख्याबळाची विधानसभा असेल आणि ज्या आमदाराला सभापतीपदासाठी उमेदवारी भरायची आहे त्याला ती भरता येईल व चाळीसही आमदारांना सभापती निवडता येईल.