राज्य सरकार कामे करत नाही म्हणून केंद्राकडे गेलो! विजय सरदेसाई, 'एनडीए'त जाण्याचा प्रश्नच नाही

By किशोर कुबल | Published: June 9, 2023 11:05 AM2023-06-09T11:05:56+5:302023-06-09T11:06:17+5:30

राज्य सरकार कामे करत नाही म्हणून केंद्रीय मंत्र्यांकडे कैफियत मांडावी लागल्याचे ते 'लोकमत'शी बोलताना म्हणाले. 

i went to the center because the state government is not working vijai sardesai | राज्य सरकार कामे करत नाही म्हणून केंद्राकडे गेलो! विजय सरदेसाई, 'एनडीए'त जाण्याचा प्रश्नच नाही

राज्य सरकार कामे करत नाही म्हणून केंद्राकडे गेलो! विजय सरदेसाई, 'एनडीए'त जाण्याचा प्रश्नच नाही

googlenewsNext

किशोर कुबल, लोकमत न्यूज नेटवर्क पणजी :गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांच्या गाठीभेटी घेण्याचा सपाटा लावल्याने ते एनडीएमध्ये जाण्याच्या तर तयारीत नसावेत ना, असा होरा व्यक्त होत असतानाच सरदेसाई यांनी मात्र ही शक्यता फेटाळून लावली आहे.

राज्य सरकार कामे करत नाही म्हणून केंद्रीय मंत्र्यांकडे कैफियत मांडावी लागल्याचे ते 'लोकमत'शी बोलताना म्हणाले. यापूर्वीच्या सरकारमध्ये विजय सरदेसाई हे मंत्री होते. गोवा फॉरवर्डच्या तत्कालीन तिन्ही आमदारांना २०१७ च्या निवडणुकीनंतर पर्रीकर सरकारने मंत्रिमंडळात घेतले होते. परंतु जुलै २०१९ मध्ये बाबू कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमधून फुटून आलेल्या दहा आमदारांना भाजप प्रवेश देऊन सरदेसाई व अन्य दोन मंत्र्यांना सावंत यांनी मंत्रिमंडळातून डच्चू दिला. त्यानंतरही काही काळ सरदेसाई यांनी एनडीएशी संबंध ठेवले होते. परंतु नंतर ते तोडले.

सरदेसाई म्हणाले की, माझी ही दिल्ली भेट राजकीय स्वरूपाची मुळीच नव्हती. लोकप्रतिनिधी या नात्याने मी लोकांचे प्रश्न घेऊन गेलो होतो. बरे, या समस्या केवळ माझ्या फातोर्डा मतदारसंघापुरत्या मर्यादितही नव्हत्या. सासष्टी तालुक्यातील तसेच भोम- करमळी बगलमार्गाचा विषयही मी मांडला. करमल घाटात झाडे वाचवण्यासाठी व्हायाडक्ट बांधणे आवश्यक आहे, याकडेही मी लक्ष वेधले. बाणावली राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील वेस्टर्न बगल मार्ग स्टिल्ट्सवर बांधण्यात यावा ज्यामुळे पर्यावरणाचे नुकसान टाळता येईल आणि वाहतूक सुरळीत होईल, हे मी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना पटवून दिलेले आहे. स्टिल्टवर बांधकाम झाले नाही तर बाणावलीहून फातोर्ल्यापर्यंत पाणी येण्याचा धोका आहे. ५०० कोटी रुपये खर्चून दक्षिण जिल्हा इस्पितळ बांधले. आता ही इमारत खासगी मेडिकल कॉलेजसाठी खासगी कंपन्यांना लाटण्याचा घाट घातला जात आहे. लोकप्रतिनिधी म्हणून या गोष्टी केंद्रासमोर मांडाव्यात, असे मला वाटले.

जनताच त्यांना धडा शिकवणार

मी माझी वैयक्तिक कामे घेऊन गेलो नव्हतो. मी राज्याच्या समस्या मांडल्या आहेत. गडकरींनी मला यासंबंधी आश्वासन दिलेले आहे. गोव्यातील पायाभूत सुविधांबाबतच्या गंभीर समस्या मी त्यांच्या नजरेस आणून दिल्या. कोणी जर ही कामे अडवत असतील तर त्यांना जनताच धडा शिकवील. राज्य सरकार लोकांना त्रास देण्यासाठी आहे का, असा उलट सवाल सरदेसाई यांनी केला.

गडकरी, मांडविया यांची भेट

सरदेसाई यांचे केंद्रातील भाजप नेते, मंत्री यांच्याशी चांगले संबंध आहेत. काल ते नितीन गडकरी, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांना भेटले. गडकरींसारख्या केंद्रातील वजनदार भाजप नेत्याने सरदेसाई यांना अपॉइंटमेंट दिली. दोन दिवस सरदेसाई भाजप नेत्यांना भेटले. त्यामुळे ते पुन्हा एनडीएकडे सोयरीक करू पाहत आहेत का? अशी शक्यता राजकीय विश्लेषकही व्यक्त करीत आहेत. 'लोकमत' प्रतिनिधीशी बोलताना सरदेसाई यांनी तसे काही नसल्याचे सांगून विषयाला बगल दिली.


 

Web Title: i went to the center because the state government is not working vijai sardesai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.