प्रतापसिंग राणेंचा आदर्श लोकांसमोर कायम राहावा: मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2024 10:57 AM2024-01-29T10:57:11+5:302024-01-29T10:58:05+5:30

प्रतापसिंग राणे यांच्या ८५व्या वाढदिनाच्या कार्यक्रमास जनसागर; 'मेकर ऑफ मॉडर्न गोवा' पुस्तकाचे प्रकाशन

ideal of pratap singh rane should remain before the people said cm pramod sawant | प्रतापसिंग राणेंचा आदर्श लोकांसमोर कायम राहावा: मुख्यमंत्री

प्रतापसिंग राणेंचा आदर्श लोकांसमोर कायम राहावा: मुख्यमंत्री

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: प्रतापसिंग राणे यांच्यासारखे नेते गोव्याला मिळाले, हे आमचे भाग्य होय, गोव्याला घटक राज्य दर्जा त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातच मिळाला, राज्याला स्वतःची भाषा, अस्मिता प्राप्त झाली, राणे यांच्या कारकिर्दीतच अनेक प्रकल्पांची पायाभरणी झाली. त्यांनी गोव्यासाठी दिलेले योगदान फार मोठे असून त्यांचा आदर्श कायम लोकांसमोर राहील,' असे उद्‌गार मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काढले.

रविवारी पर्ये सत्तरी येवील हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत राणे यांच्या ८५ व्या वाढदिनाचा कार्यक्रम झाला. राणे यांच्या कर्तृत्वाचा मागोवा घेणारे तसेच त्यांचा जीवनपट उलगडणारे, पत्नी सौ. विजयादेवी यांनी लिहिलेल्या 'मेकर ऑफ मॉडर्न गोवा: दि अनटोल्ड स्टोरी ऑफ प्रतापसिंग राणे या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते झाले.

व्यासपीठावर गौरवमूर्ती प्रतापसिंग राणे, सौ. विजयादेवी राणे, मुख्यमंत्री सावंत, माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभु, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राणे यांचे सुपुत्र आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, आमदार सौ. दिव्या राणे, प्रतापसिंग यांची कन्या विश्वधारा डहाणूकर, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, 'सत्तरीच्या लोकांनी पन्नास वर्षे राणेंतर प्रेम केले आणि त्यांना निवडून दिले राणे यांनीही सत्तरीवासीयांना प्रेम दिले. लोक त्यांना 'खारों' असे प्रेमाने म्हणतात. आमदारकीची तब्बल ५० वर्षे पूर्ण करणारे राणे हे एकमेव नेते ठरले आहेत. त्यांचा आदर्श सदोदीत लोकांसमोर रहायला हवा, राणे हे पर्यावरणप्रेमी, वन आणि निसर्गप्रेमी आहेत, सभापतीपदी असताना त्यांनी जे निवाडे दिले, तेही संदर्भासाठी खूप उपयुक्त ठरत आहेत. केवळ गोव्यातच नव्हे तर इतर राज्यांमध्ये आजही सभापतीपदी असताना त्यांनी दिलेले निवाडे संदर्भासाठी घेतात.

मुख्यमंत्री सावंत आवर्जुन उल्लेख करताना म्हणाले की, 'राणे विधानसभा अधिवेशनाचे कामकाज संपेपर्यंत सभागृहात बसत होते. गोव्याच्या सुरुवातीपासूनच्या मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी काम केले आहे. भाऊसाहेब बांदोडकर, मनोहर पर्रीकर यांचे नाव गोव्यात विकासासाठी घेतले जाते. राणे यांचेही नाव लोकांकडून असेच घेतले जाईल.' राणे यांनी वयाची शंभरी पूर्ण करुन तो वाढदिवसही साजरा करण्याची संधी आम्हाला मिळो, अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी केली.

केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले की, 'राणे कायम लोकआदरास पात्र ठरले. त्यांचे कार्य गौरवशाली आहे. मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक विकासकामे केली. कदंब बससेवा, कला अकादमी त्यांची मोठी देणगी आहे. राजकारणात राहून नमस्कारास पात्र ठरलेल हे व्यक्तिमत्त्व होय, प्रशासनात त्यांचा कायम वचक राहिला तसेच त्यांच्याबद्दल जनतेला नितांत आदरही आहे.'

भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे म्हणाले की, 'गोव्याच्या राजकारणातील आदर्श व्यक्ती म्हणून नेहमीच प्रतापसिंग राणे यांच्याकडे पाहिले जाईल, त्यांच्या कार्याचा प्रभाव आमच्यासारख्या अनेक राजकीय नेत्यांवर आहे. गोव्याच्या प्रत्येक विकासात त्यांचे योगदान आहे. साडेसतरा वर्षे ते मुख्यमंत्री होते. त्यांचा प्रशासनावर मोठा वचक होता. गोव्याच्या राजकीय इतिहासात राणे यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे अखंड आधारस्तंभ असलेल्या नेत्याच्या चिरस्थायी वारशाचे प्रतिबिंबच आहे.'

सावंत मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, आजी-माजी आमदार, प्रशासनातील आजी-माजी अधिकारी, मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल, पोलिस महासंचालक जसपाल सिंग, गोवा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष तथा थेंपो उद्योग समुहाचे चेअरमन श्रीनिवास थेंपो, फोमेंतो ग्रुपचे चेअरमन अवधूत लिंबलो, टीटीएजीचे माजी अध्यक्ष तथा हॉटेल व्यावसायिक राल्फ डिसोझा कार्यक्रमास उपस्थित होते.

विश्वजीत झाले भावूक, कंठ दाटला

विश्वजित राणे कार्यक्रमावेळी अनेकदा भावूक झाले. ते म्हणाले की, 'सत्तरी सांभाळणे सोपे काम नव्हे, अनेकदा तरुण मतदारांचे व वडिलांचे धोरण वेगवेगळे असायचे, ते जुळवून घ्यावे लागले. सत्तरीतील जनतेची भावना साहेबांशी जुळलेली आहे. सत्तरीवासीयांनी आम्हाला जे प्रेमच पाठबळ दिले, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माइयाकडे शब्दही नाहीत. वडिलांनी घालून दिलेला आदर्श मी खंबीरपणे पुढे नेईन, पंतप्रधान नरेंद्र मोदी वांनीही प्रतापसिग यांच्या कार्याची वेळोवेळी स्तुती केलेली आहे. वडिलांसारखे बना, असा सल्ला मला मोदींनी दिला आहे.

शेवटी मीच लिहिले: विजयादेवी राणे

विजयादेवी राणे म्हणाल्या की, तुम्ही जीवनचरित्र लिहा, असे प्रतापसिंग राणे यांना लोक सांगायचे. मात्र ते नेहमीच म्हणत असत की, मला काही लिहायचे नाहीय. मी गोव्यासाठी फक्त माझे कर्तव्य केले, मोठे काहीही केलेले नाहीं. शेवटी मीच लिहिले. सत्तरी व गोव्याच्या लोकांनी साथ दिली म्हणून प्रतापसिंग राणे काम करू शकले. पुढील पिढीला त्यांचे कार्य कळायला हवे. गेल्या वर्षी २८ जानेवारी रोजी पुस्तक लिहिण्याचा संकल्प केला होता व वर्षभरात तो पूर्ण करण्याचे ठरवले होते, त्यानुसार हे पुस्तक पूर्ण हाऊन प्रकाशन होत आहे.

'लोकांची कायम साथ'

प्रतापसिंग राणे म्हणाले की, मला लोकांनी कायम साथ दिली. त्यामुळे मी विकासकामे करू शकलो, गोवा हा भारताचा चमकता हिरा आहे. सदैव गोव्याची प्रगती होत राहो, असे मी ईश्वराकडे मागतो. लोकांनी मला भरभरुन प्रेम दिल्याने सर्वांचे मी आभार मानतो,'

शंभरीही पूर्ण करतील 

या कार्यक्रमासाठी खास उपस्थित माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू म्हणाले की, राणे यांनी मोते कार्य केले आहे. केवळ गोव्यासाठीच नव्हे तर देशासाठीही त्यांचे योगदान आहे. निसर्ग सांभाळून विकास करता येतो, हे राणे यांनी दाखवून दिले पर्यावरण सांभाळत त्यानी अनेक पायाभूत प्रकल्प आणले. अटबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना मी केंद्रात भाजप सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्री होतो. राणे तेव्हा गोव्यात काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री होते, त्यांनी मला प्रोत्साहन दिले. राणे यांचे कार्य नव्या पीढीसाठी स्फूर्ती देईल, राणे क्याची शंभरीही पूर्ण करतील' अशा शुभेच्छा देऊन राणेंवरील पुस्तक नव्या पिढीला प्रेरणादायी ठरेल, असे प्रभू म्हणाले.

प्रख्यात गायिका हर्षदीप कौर हिने एकापेक्षा एक गीते पेश करुन उपस्थितांची वाहवा मिळवली, अभिनेत्री हेमामालिनी यांचाही कार्यक्रम झाला.


 

Web Title: ideal of pratap singh rane should remain before the people said cm pramod sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.