कुर्डीच्या जलाशयात सापडली 14व्या शतकातील वेताळाची मूर्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2019 05:49 PM2019-07-02T17:49:47+5:302019-07-02T17:49:55+5:30
उन्हाळ्याच्या दोन महिन्यांतच पाण्याच्या वर येणारे गाव म्हणून सध्या प्रचलित असलेल्या कुर्डीच्या जलाशयात सापडलेली वेताळाची मूर्ती 600 वर्षापूर्वीची असून त्या मूर्तीवर जी कलाकुसर सापडली आहे.
- सुशांत कुंकळयेकर
मडगाव: उन्हाळ्याच्या दोन महिन्यांतच पाण्याच्या वर येणारे गाव म्हणून सध्या प्रचलित असलेल्या कुर्डीच्या जलाशयात सापडलेली वेताळाची मूर्ती 600 वर्षापूर्वीची असून त्या मूर्तीवर जी कलाकुसर सापडली आहे. ती 14व्या शतकातील असावी असा निष्कर्ष गोवा पुरातत्व खात्याने व्यक्त केला आहे. सध्या या वेताळाच्या मूर्तीसह या भागात सापडलेल्या आणखी तीन मूर्ती पुरातत्व खात्याने आपल्या ताब्यात घेतल्या असून, लवकरच या मूर्ती पुरातत्व खात्याच्या संग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत.
यंदा पावसाळा उशिरा सुरू झाल्याने कुर्डीतील जलाशयाचे पाणी नेहमीच्या तुलनेत अधिक खाली गेल्याने लोकांना या जलाशयात वेताळाची मूर्ती दिसून आली होती. त्याशिवाय या जलाशयात एक दुर्गेची व एक भूमातेची मूर्ती सापडली होती. त्याशिवाय एक शिवलिंगही मिळाले होते. जी वेताळाची मूर्ती सापडली होती तिची उंची 2.6 मीटर एवढी उंच होती. पूर्ण एका दगडातून कोरण्यात आलेल्या या मूर्तीचे वजन जवळपास दोन टन एवढे होते. या वेताळाच्या पोटावर विंचू कोरण्यात आला असून, दोन्ही भुजांवर नाग तर मस्तकावर असलेल्या मुकूटावर 15 नागांच्या प्रतिमा होत्या. या मूर्तीच्या हातात ‘रक्तपात्र’ असून त्याच्या कंबरेला असंख्य दागिने होते. अशा प्रकारची कलाकुसर गोव्यात 14व्या शतकात कोरलेल्या मूर्तीवर सापडली आहे.
कुर्डी हा गाव गोव्यातील अतिप्राचीन गावापैकी एक असून या गावात 14व्या व 15व्या शतकातील अनेक मूर्ती आणि मंदिरे होती. मात्र दक्षिण गोव्याला पाणीपुरवठा करण्यासाठी साळावली धरणाची महत्त्वाकांक्षी योजना 35 वर्षांपूर्वी राबविण्यात आल्याने हा गाव पूर्णत: पाण्याखाली गेला. आता वर्षातील दहा महिने हा गाव पाण्याखालीच असतो. मात्र एप्रिल व मे या दोन महिन्यात या जलाशयातील पाणी ओसरु लागल्यानंतर हा गाव पुन्हा पाण्यावर येतो. या गावातले प्रमुख दैवत असलेले सोमेश्र्वराचे मंदिर अजूनही या गावात सुस्थितीत असल्याने या दोन महिन्यात कित्येक लोक या गावाला भेट देतात. यंदा पाऊस उशिरा आल्याने हा जलाशय नेहमीपेक्षा यंदा जास्त आटला. त्यामुळे या मूर्ती यंदा दिसून आल्या.
पुरातत्व खात्याचे सहाय्यक अधीक्षक वरद सबनीस यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे अत्यंत पुरातत्व महत्व असलेल्या या चारही मूर्ती असून त्यातील वेताळाची मूर्ती सुळकणे येथील वेताळ मंदिरातील आहे. या देवळातील वेताळाच्या मूर्तीला दहा वर्षांपूर्वी तडा गेल्याने स्थानिकांनी ती साळावलीच्या पाण्यात विसर्जित केली होती. अशा प्रकारच्या मूर्ती कुर्डीच्या जलाशयात सापडल्याचे वृत्त पसरल्यावर लोकांसाठी ते आकर्षण ठरले होते. मात्र काही पर्यटकांनी या मूर्तीचे विद्रुपीकरण करण्यास सुरुवात केल्याची माहिती मिळाल्यानंतर पुरातत्व खात्याने त्या मूर्ती आपल्या ताब्यात घेण्याचे ठरविले होते. 28 जून रोजी या मूर्ती पाण्यातून वर काढण्यात आल्या होत्या. मात्र त्या दिवशी मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे आणि माती ओली झाल्यामुळे वाहन जलाशयापर्यंत नेणे शक्य नसल्याने स्थानिकांच्या मदतीने या मूर्तींवर काढण्यात आल्या, अशी माहिती पुरातत्व खात्याने दिली.
वेताळाचा संबंध उद्योग व्यवसायाशी
ज्या जलाशयात वेताळाची ही मूर्ती सापडली तो कुर्डी गाव गोव्यातील अगदी जुन्या गावापैकी एक असून महापाषाणी युगापासून या गावात लोकवस्ती होती असे अभ्यासावरून दिसून आले आहे, अशी माहिती लोकवेद अभ्यासक व पर्यावरण चळवळीतील अग्रणी कार्यकर्ते राजेंद्र केरकर यांनी दिली. ते म्हणाले, कुर्डी गाव हा घाट मार्गाने कर्नाटकाशी जोडलेला असून या मार्गाने होत असलेल्या व्यापाराची एकेकाळी कुर्डी ही मुख्य पेठ असावी. या भागात यापूर्वी ज्या मूर्ती सापडल्या आहेत त्यावरून या गावाची प्राचीनता लक्षात येते. कुर्डी परिसरात वेताळाच्या कित्येक मूर्ती पूर्वी होत्या. ज्या गावात व्यापारी उलाढाल पूर्वी व्हायची त्या ठिकाणी वेताळाच्या मूर्ती हमखास असायच्या अशी माहिती त्यांनी दिली.