मानसन्मान मिळत नसेल, तर राजीनामा देऊ: सभापती रमेश तवडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2024 12:16 PM2024-11-13T12:16:32+5:302024-11-13T12:20:16+5:30

मंत्र्यांवर व्यक्त केली नाराजी; सभापतींचा उद्वेग उघड

if do not get respect will resign said speaker ramesh tawadkar | मानसन्मान मिळत नसेल, तर राजीनामा देऊ: सभापती रमेश तवडकर

मानसन्मान मिळत नसेल, तर राजीनामा देऊ: सभापती रमेश तवडकर

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : राज्य सरकार व मंत्री सभापतिपदाला योग्य मान-सन्मान देत नसतील, तर आपण गोमंतकीय जनतेचा मान राखण्यासाठी, पदाची शान राखण्यासाठी पदत्याग करायला तयार आहे, असा इशारा सभापती डॉ. रमेश तवडकर यांनी दिला. मडगाव येथे मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 'आज जे लोक माझ्यावर आरोप करतात, ते राजकारणच नव्हे, तर समाजकारणातही नव्हते, तेव्हापासून मी लोकांसाठी कार्यरत आहे,' अशी टीका त्यांनी केली.

सभापती तवडकर म्हणाले की, 'फर्मागुडी येथे 'उटा'चा द्वीदशक महोत्सव साजरा झाला. मला काही तत्त्वे पटत नसल्याने मी 'उटा'पासून लांब राहिलो, पण नंतर माझ्याविरोधात सोशल मीडिया व काही वृत्तपत्रांमधून टीका होत आहेत. मी २०१२ मध्ये समाजकल्याण खात्याचा मंत्री होतो, त्यावेळी समाजासाठी २५ योजना मार्गी लावल्या. माझे काम पेडणे ते काणकोणमधील जनतेला माहीत आहे. समाजालाही त्याची जाणीव आहे.'

तवडकर म्हणाले की, 'उटा' संघर्ष या पुस्तकात मी खलनायक आणि बाकी सर्वजण नायक असा उल्लेख केला गेला. त्याला मी, माझ्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला होता. ज्यावेळी उटा संघटना अस्तित्वात नव्हती, . त्यावेळी ७ सप्टेंबर २००० साली आदर्श युवक संघाचे कार्यकर्त्यांसोबत काणकोणमध्ये मेळावा घेतला. मी १९९६ पासून आदर्श युवक संघाच्या माध्यमातून समाजासाठी काम सुरू केले, हे सर्वांना माहीत आहे. तवडकर म्हणाले की, '२०१२ साली मी समाजकल्याण खात्याचा मंत्री झाल्यानंतर मी प्रकाश वेळीप यांना आपल्या संघटनेचे कार्य करीत राहा, मी तुमच्यासोबत नाही, असे त्यांना सांगितले. कारण मी सरकारमध्ये मंत्री होतो. उटा संघटनेला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, परंतु तात्विक विषयामुळे मी त्यांच्यापासून दूर राहिलो.

सहनशीलतेचा अंत पाहू नका 'उटा'च्या नेत्यांनी आपले कार्य करावे. सर्व 'श्रेय त्यांनी घ्यावे, परंतु माझ्यावर समाज माध्यमातून, तसेच वृत्तपत्रांतून नाहक आरोप करू नयेत. माझ्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. जर यापुढे हे असेच सुरू राहिले, तर योग्य वेळी पुढील कारवाई करण्यात येईल,' असा इशारा सभापती तवडकर यांनी दिला.

वेळीपांची भूमिका वेगळी होती

सभापती म्हणाले की, 'आज उटाच्या माध्यमातून समाजाचा मेळावा घेणारे माजी मंत्री प्रकाश वेळीप यांनी पूर्वी वेगळी भूमिका घेतली होती. त्यांना मोअर ओबीसी म्हणजे ओबीसींमध्ये वेगळा गट हवा होता. तसा ठरावही त्यांनी विधानसभेत मांडला होता. ते समाजाला आदिवासी समाजाचा दज मिळण्याच्या बाजूने नव्हते. गाकुवेध चळवळीत अनेक नेत्यांनी योगदान दिले. बाबुसो गावकर, आंतोन गावकर, काशिनाथ जल्मी, लुईस (माम) कार्दोज या नेत्यांचे मोठे योगदान होते.'

 

Web Title: if do not get respect will resign said speaker ramesh tawadkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.