'कामधेनू'च्या गाई रस्त्यावर दिसल्यास अनुदान परत घेऊ! मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2024 01:12 PM2024-06-29T13:12:01+5:302024-06-29T13:13:15+5:30
तशा सूचना पशुसंवर्धन खात्याच्या अधिकाऱ्यांना दिल्याचेही त्यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : पशुसंवर्धन खात्यातर्फे शेतकऱ्यांना कामधेनू योजनेच्या अंतर्गत एका गायीसाठी ६० हजार रुपये खर्च केले जातात. या योजने अंतर्गत घेतलेल्या गायी दूध काढल्यानंतर रस्त्यावर सोडलेल्या दिसल्यास संबंधितांसाठी कामधेनू योजना कायमची बंद करून दिलेले अनुदान परत घेतली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला आहे. तशा सूचना पशुसंवर्धन खात्याच्या अधिकाऱ्यांना दिल्याचेही त्यांनी सांगितले.
शहरातील भटक्या गुरांची समस्या सोडवण्यासाठी पालिकेतर्फे व पिपल फॉर अॅनिमल यांच्या सहकार्याने निरंकार येथे गोशाळा उभारण्यात आली आहे. या गोशाळेचे उद्घाटन व गुरांचे पूजन मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास कृषिमंत्री रवी नाईक, सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, पशुसंवर्धन मंत्री नीळकंठ हळर्णकर, खात्याचे संचालक डॉ. नितीन नाईक, नगराध्यक्ष रितेश नाईक, उपनगराध्यक्ष दीपा कोलवेकर, जिल्हा पंचायत सदस्य दीपक नाईक बोरकर, बेतोडाचे सरपंच मधू खांडेपारकर, पंच सदस्य गीता गावडे, जमिनीचे मालक भवानी प्रसाद पाटील, योगीराज गोसावी व विशांत नाईक, माजी नगरसेवक शांताराम कोळवेकर, मुख्याधिकारी योगीराज गोसावी, पंच सदस्य वैशाली सालेलकर, नंद नाईक, रूपक देसाई आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, निरंकाल येथे युवकांनी ज्या प्रकारे भटक्या गुरांची जबाबदारी घेण्यासाठी गोशाळा उभारली, त्याच प्रकारे सर्व बाराही तालुक्यांमध्ये गोशाळा झाल्या तर राज्यातील भटक्या गुरांची समस्या नक्कीच सुटेल. राज्यात होणाऱ्या अपघातामधील २५ टक्के अपघात हे केवळ भटक्या गुरांमुळे होतात. त्यामुळे कामधेनू योजनेच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या गायी रस्त्यावर फिरताना दिसल्या तर ते खपवून घेणार नाही. प्रत्येक गोष्ट सरकार करेल, याची लोकांना सवय झाली आहे. लोक आपली जबाबदारी विसरत चालले आहेत, असे ते म्हणाले.
यावेळी हळर्णकर म्हणाले, भटक्या गुरांची समस्या जटील बनली आहे. या गुरांमुळे अनेक अपघात होतात. ते टाळण्यासाठी सर्वांनी एकजूट होऊन काम करण्याची आवश्यकता आहे. गोशाळांनी पुढाकार घेऊन या भटक्या गुरांची सोय करावी, त्यासाठी लागत असलेला निधी पुरवण्यासाठी आमचे खाते समर्थ आहे.
ज्या प्रकारे भटक्या गुरांची समस्या सोडवण्यात आली आहे, त्याच प्रकारे शहरातील भटक्या तसेच जखमी कुत्र्यांवर उपचार करण्यासाठी शेल्टर उभे करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी नगराध्यक्ष नाईक यांनी पशुसंवर्धन खात्याकडे केली आहे. यावेळी संतोष सतरकर, सुनील राठोड, संकेत तेंडुलकर, दिलीप नाईक, देवेंद्र ढवळीकर व जागेचे मालक भवानी पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन नितीन कोलवेकर यांनी केले, तर स्वागत योगीराज गोसावी यांनी केले. आभार विशांत नाईक यांनी मानले.
व्यावसायिक दृष्टिकोन ठेवा
गोशाळांकडे केवळ सामाजिक कार्य म्हणून न पाहता त्याकडे व्यावसायिक दृष्टीने पाहिले पाहिजे. आज बाजारात गोमूत्र, गोवऱ्या यांना मोठी मागणी आहे. गोसेवा करताना व्यवसाय करण्याची संधी आहे. यासाठी सरकार महिलांना व युवकांना पाठबळ द्यायला तयार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
कपिला गायीसाठी प्रतिदिन ८० रुपये
कपिला गायीचे दूध अत्यंत पौष्टिक व औषधी आहे. या गाईचे दूध एक लिटरवरून आठ लिटरपर्यंत नेण्याचे संशोधन आयसीआरने सुरू केले आहे. कपिला गाय कमी दूध देत असल्यामुळे अनेकांनी तिला सोडून दिले आहे. जर्सी गाय जास्त दूध देत असल्यामुळे तिचे पालन केले जात आहे. कपिला गायीचे संवर्धन करण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. शेतकऱ्यांना कपिला गाय पालन करण्यासाठी प्रतिदिन ८० रुपये पशुसंवर्धन खात्यातर्फे दिले जातील.