देशाला अर्थव्यवस्था वाढवायची असेल तर, अधिक बचत करणे आवश्यक - निखिल गुप्ता
By समीर नाईक | Published: February 23, 2024 02:25 PM2024-02-23T14:25:18+5:302024-02-23T14:25:48+5:30
सरकारने स्वतःचे कर्ज कमी केले पाहिजे, असे गुप्ता यांनी यावेळी सांगितले.
पणजी : भारताला आपली अर्थव्यवस्था ८ टक्के दराने वाढवायची असेल तर पुढील दोन दशकांमध्ये अधिक बचत करणे आवश्यक आहे.अर्थव्यवस्थेत घरगुती (घरे आणि छोटे व्यवसाय), कॉर्पोरेट क्षेत्र, सरकार आणि विदेशी व्यापार हे चार प्रमुख घटक असल्याचे सांगितले. हे घटक कोणतीही अर्थव्यवस्था बनवतात किंवा बिघडतात, असे मत अर्थतज्ज्ञ निखिल गुप्ता यांनी व्यक्त केले.
पणजीत शुक्रवारी सकाळी इंटरनॅशनल सेंटर गोवा (आयसीजी) येथे त्यांच्या “द एट पर्सेंट सोल्युशन” या पुस्तकावर आयोजित व्याख्यानात गुप्ता बोलत होते. यावेळी वाणिज्य आणि अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण देशाला बचत करायची असेल आणि वाढीचा दर स्थिर ठेवायचा असेल तर राज्य आणि केंद्र सरकारांनी त्यांचे कर्ज कमी करणे आवश्यक आहे. आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी सरकारने घरगुती क्षेत्रात बचतीला प्रोत्साहन दिले पाहिजे. खाजगी क्षेत्राला पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये अधिक गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करून सरकारने स्वतःचे कर्ज कमी केले पाहिजे, असे गुप्ता यांनी यावेळी सांगितले.
सरकारने स्वतःचे कर्ज कमी करण्यासाठी संरक्षण, रेल्वे आणि रस्ते बांधणी यासारख्या क्षेत्रांचे खाजगीकरण केले पाहिजे. बचत हा गुंतवणुकीसाठी प्राथमिक स्त्रोत आहे. गुंतवणूक कोणत्याही देशात सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) वाढीस मदत करते. केवळ साधा उपभोग अर्थव्यवस्थेच्या वाढीस मदत करू शकत नाही, असे गुप्ता यांनी अधिक माहिती देताना सांगितले.
अमेरिकेत आर्थिक संकट येण्याची शक्यता
कोणत्याही उदयोन्मुख अर्थव्यवस्थेसाठी अमेरिका हा चांगला आदर्श नाही. आज ते मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी कर्ज माफ करत आहेत. याचे परीणाम लवकरच दिसू लागतील आणि ४ ते ५ वर्षांत यूएसएला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल, असे अमेरिकेच्या कर्जाभिमुख अर्थव्यवस्थेवर बोलताना गुप्ता यांनी सांगितले.