झोन मसुदा आराखडा सोमवारपर्यंत मागे न घेतल्यास पेडणेंत सर्वत्र रस्ता रोको; जीत आरोलकर यांचा इशारा
By किशोर कुबल | Published: October 6, 2023 02:45 PM2023-10-06T14:45:58+5:302023-10-06T14:46:15+5:30
'मोपा पीडीएने निश्चित केलेल्या झोन प्लॅन मुळे तालुक्यातील तब्बल १.४४ कोटी चौरस मीटर जमीन रुपांतरीत झालेली आहे.
पणजी : मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मोपा पीडीएने झोन मसुदा आराखडा केला निश्चित केला आहे. सोमवारपर्यंत तो मागे न घेतल्यास पुढील दहा-पंधरा दिवसात लोकांमध्ये जागृती करून पेडणेंत सर्वत्र रस्ता रोको करु, असा इशारा मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी दिला आहे.
आरोलकर यांनी शिस्तमंडळासह या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर ते लोकमतशी बोलताना म्हणाले की, 'मुख्यमंत्र्यांनी आपण नगर नियोजनमंत्र्यांकडे चर्चा करून सोमवारपर्यंत निर्णय घेऊ, असे आम्हाला सांगितले आहे. परंतु आमची अशी मागणी आहे की ताबडतोब हा मसुदा आराखडा रद्द करावा. पेडणे बचाव अभियानच्या माध्यमातून आम्ही पेडणे तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये जाऊन शेतकरी, स्थानिक लोक यांच्यात जागृती करणार आहोत. त्यांना झोन प्लॅन म्हणजे काय ते सविस्तर सांगणार आहोत. दहा ते पंधरा दिवसात जागृती झाल्यानंतर सरकारने जर हा आराखडा रद्द नाही केला तर तालुक्यातील प्रत्येक गावात 'रस्ता रोको' करून कामकाज ठप्प केले जाईल.'
या प्रतिनिधी बोलताना आरोलकर पुढे म्हणाले की, 'मोपा पीडीएने निश्चित केलेल्या झोन प्लॅन मुळे तालुक्यातील तब्बल १.४४ कोटी चौरस मीटर जमीन रुपांतरीत झालेली आहे. लोकांच्या जमिनींमधून रस्ते दाखवलेले आहेत. मंदिरे, घरांवर कुऱ्हाड कोसळणार आहे. हे आम्ही सहन करून घेणार नाही. पेडणे तालुक्यातील जनतेबरोबर मी ठामपणे उभा राहीन. तालुक्यातील सर्वांना आधी विश्वासात घेतले जाईल. या झोन प्लॅनविरोधात पेडण्यातील जनता पूर्ण ताकदीने रस्त्यावर उतरणार आहे हे सरकारने ध्यान ध्यानात ठेवावे असा इशाराही त्यांनी दिला आहे.
पेडणेतील झोन प्लॅनचा हा विषय गेले काही दिवस गोव्यात गाजत असून सरकारने हा झोन प्लॅन रद्द न केल्यास प्रसंगी सरकारमधून मी बाहेर पडेन, असा इशाराही याआधी जीत आरोलकर यांनी दिलेला आहे. आरोलकर हे मगोपचे आमदार असून सावंत सरकारला गोवा विधानसभेत या पक्षाने पाठिंबा दिलेला आहे.